
जगात परफेक्ट असं काहीच नसतं. प्रत्येकात काही ना काही कमी असते. मग ती व्यक्ती असो वा वस्तू. अशीच एक त्रुटी लोकप्रिय इन्स्टाग्राम या अॅपमध्येदेखील होती. ही त्रुटी सोलापूरच्या एका पठ्ठय़ाने फेसबुकच्या लक्षात आणून दिली. त्यासाठी फेसबुकने या तरुणाला तब्बल 30 हजार डॉलरचे म्हणजेच 22 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
बार्शीतील मयूर फरताडे या 21 वर्षीय तरुणाने इन्स्टाग्राम या अॅपमधील ही त्रुटी शोधून काढली आहे. त्यामुळे लाखो युजर्सचा डेटा हॅकर्सच्या हातात येण्यापासून वाचला आहे. मयूर कोल्हापूरच्या तात्यासाहेब कोरे इंजिनीअरिंग कॉलेजात कॉम्प्युटर सायन्सचे धडे घेत आहे. नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी वेगवेगळ्या सिक्युरिटी रिर्सेसेसचे तो वाचन करतो. त्यातून इन्स्टाग्राममधील त्रुटी शोधण्यासाठी त्याला प्रोत्साहन मिळाले. इन्स्टाग्राममध्ये असलेल्या त्रुटीमुळे कुणीही कोणालाही फॉलो न करता त्याच्या अका&इव्ह पोस्ट, स्टोरी, रील आणि आयजीटीव्ही सहज पाहू शकत होते. युझर्सची सर्व माहिती गोळा करून याद्वारे फेसबुक अकाऊंटदेखील हॅक होण्याचा धोका होता. मयूरच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने ही त्रुटी फेसबुकच्या लक्षात आणून दिली.
युजर्सचा डेटा झाला सुरक्षित
मयूरने बग बॉऊंटी प्रोग्रामच्या माध्यमातून इन्स्टाग्राममधील ही त्रुटी 16 एप्रिलला फेसबुक या कंपनीच्या लक्षात आणून दिली. 19 एप्रिलला फेसबुकने मयूरसोबत संपर्क साधला आणि यासंदर्भात अधिक माहिती देण्याची त्याला विनंती केली. मयूरने दिलेल्या माहितीच्या आधारे इन्स्टाग्राममध्ये आवश्यक ते सर्व बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे लाखो युजरचा डेटा सुरक्षित झाला आहे. यापूर्वीदेखील मयूरने शासनाच्या वेबसाईटमध्ये असलेल्या त्रुटी निदर्शनास आणून दिल्या आहेत.


























































