हिमालय वितळणार, समुद्राची पातळी वाढणार? ग्लोबल वॉर्मिंगवरील अहवालाने भरवली धडकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वातावरणातील बदलांमुळे काही वर्षांतच हिमालय आणि समुद्रकिनाऱ्यांलगतच्या शहरांवर गंभीर परिणाम होतील, असा इशारा एका अहवालातून देण्यात आला आहे. इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजने हा अहवाल जारी केला आहे. या संकटांपासून वाचायचं असेल तर ताबडतोब हालचाली करणं गरजेचं असल्याचंही अहवालात म्हटलं आहे.

संयुक्त राष्ट्रांनी जारी केलेल्या या अहवालावर 14 ते 26 फेब्रुवारी दरम्यान ऑनलाईन पद्धतीने चर्चा घेण्या आली. जवळपास दोन आठवडे चाललेल्या या चर्चेनंतर या अहवालाला 195 देशांनी मंजुरी दिली आहे. Climate Change 2022: Impacts, Adaptation and Vulnerability नावाच्या या अहवालात वातावरणातील बदलांचा आढावा घेण्यात आला असून त्यावरील उपायांचाही उहापोह करण्यात आला आहे.

या अहवालानुसार, जगातील अर्ध्या लोकसंख्येवर सध्या संकट घोंघावत आहे. कारण, हे लोक अशा ठिकाणी राहत आहेत, जिथे तापमान वाढीमुळे थेट बदल दिसून येतात. जैविक यंत्रणेवर सध्या कोणत्याही मार्गाने बदल किंवा सुधारणा होताना दिसून येत नाहीये. त्यामुळे जागतिक तापमानवाढीचा प्रश्न मानवाच्या अस्तित्वापुढे आ वासून उभा आहे. पुढील काही काळात जगातील तापमानात 1.5 अंश सेल्सिअसची भर पडेल. जर अशीच तापमानवाढ होत राहिली तर त्याचे गंभीर दुष्परिणाम मानवी जीवनावर होतील. त्यात अन्न संरक्षण, पाण्याचा तुटवडा, वणवे, पूर अशा समस्या उद्भवू शकतील.

हिंदुस्थानच्या तापमान वाढीविषयीही गंभीर इशारा या अहवालात देण्यात आला आहे. तापमान वाढीमुळे देशात तांदळाचं उत्पादन 10 ते 30 टक्के घटेल, तर मक्याचं उत्पादन 25 ते 70 टक्क्यांनी घटेल. शहरात लोकसंख्या झपाट्याने वाढेल. पुढील 15 वर्षांत देशातील 60 कोटी जनता शहरात राहील. देशाला 7500 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. तापमान वाढलं तर, मुंबई, कोलकाता, चेन्नई, विशाखापट्टणम, पुरी, गोवा अशा किनाऱ्यालगतच्या मुख्य ठिकाणांवर अधिक उष्मा निर्माण होईल. समुद्राची पातळी वाढल्याने या शहरांमध्ये पुराचा धोका उद्भवेल.

समुद्राची पातळी वाढल्याने पुरासोबत चक्रिवादळंही किनाऱ्यावर धडकतील. हिमालयावरील बर्फ वितळून नद्यांची पातळी वाढेल. त्यामुळे या नद्यांच्या किनाऱ्यावर असलेल्या मानवी वस्त्यांना पुराचा धोका असेल. तसंच हिमालय वितळल्यामुळे त्याच्या आसपासच्या परिसरातील जैवविविधतेवरही त्याचा परिणाम होईल, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.