मंजू राणीची ‘सुवर्ण’ धाव; 10 किमी शर्यतीतही सोनेरी कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंगळवारी 20 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी पंजाबची आंतरराष्ट्रीय ऍथलिट मंजू राणीने बुधवारी सकाळी दहा किलोमीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून 11 व्या राष्ट्रीय खुल्या चालण्याच्या स्पर्धेत पुन्हा एकदा वर्चस्व गाजविले. यामुळे तिची आगामी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये होणाऱया मॅरेथॉन व चालणे अशा मिश्र स्वरूपाच्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी वाढली आहे.

24 वर्षीय मंजूने ही शर्यत 45 मिनिटे 20 सेकंदांत पूर्ण केली. हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत चालण्याच्या 35 किलोमीटर मिश्र स्पर्धेत राम बाबूच्या साथीने मंजू राणीने कास्यपदक जिंकले होते. अँतलया (तुर्की) येथे 20 व 21 एप्रिल रोजी होणाऱया चालण्याच्या जागतिक सांघिक स्पर्धेच्या दृष्टीने संभाव्य खेळाडूंची निवड करण्याच्या उद्देशाने हिंदुस्थानी ऍथलेटिक्स महासंघाने चंदिगडच्या स्पर्धेत दहा किलोमीटरच्या शर्यतीचा समावेश केला आहे. तुर्कीतील प्रथम 22 संघांना पॅरिस ऑलिम्पिकसाठी थेट प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे मंजू राणीचे यश महत्त्वाचे आहे. तुर्कीच्या स्पर्धेसाठी खेळाडूंची अंतिम निवड मार्च महिन्यात करण्यात येईल, असे महासंघातर्फे स्पष्ट करण्यात आले. पुरुषांच्या दहा किलोमीटर शर्यतीतही पंजाबने वर्चस्व राखले. पंजाबच्या 22 वर्षीय साहिलने सुवर्णपदकाला गवसणी घालताना 39 मिनिटे 25 सेकंद वेळ नोंदवली. पतियाळा येथे शिक्षण घेत असलेल्या साहिलने मंगळवारी 20 किलोमीटर शर्यतीत पाचवे स्थान मिळविले होते.

विजय 35 किलोमीटर शर्यतीत अव्वल

पुरुषांच्या 35 किलोमीटर शर्यतीत गोव्याच्या विजय विश्वकर्माने 2 तास 39 मिनिटे 19 सेकंदांत शर्यत पूर्ण करीत अव्वल स्थान पटकाविले. गुजरातच्या सागर चंद्राला रौप्य, तर हरयाणाच्या देवेंदर सिंगला कास्यपदक मिळाले. महिलांची शर्यत उत्तर प्रदेशच्या वंदना पालने जिंकली. तिने 3 तास 11 मिनिटे 06 सेकंद अशी वेळ घेतली. पंजाबच्या पूजा कुमारीने रौप्य व हरयाणाच्या कोमलने कास्यपदक जिंकले.