आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 वर्षांखालील खेळाडूंना नो एण्ट्री

क्रिकेटपटूंच्या सुरक्षेचा कारणास्तव आयसीसीने गुरुवारी महत्त्वाचा निर्णय घेतला. नव्या नियमानुसार आता कोणत्याही देशाला 15 वर्षांखालील खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील स्पर्धांमध्ये खेळण्याची परवानगी देता येणार नाही. यामुळे आता युवा खेळाडूमध्ये कितीही प्रतिभा असली तरी त्याला 15 वर्षे पूर्ण होण्याची वाट बघावी लागणार आहे.

सचिनचे पदार्पण 16 वर्षे अन् 205 दिवसांचा असताना

सर्वात कमी वयामध्ये कसोटी आणि वन डे क्रिकेटमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करण्याचा मान सचिन तेंडुलकरला मिळाला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 16 वर्षे व 205 दिवसांचा असताना पाकिस्तानविरुद्धच्या कराची येथील लढतीत कसोटीमध्ये पदार्पण केले. तसेच 16 वर्षे व 238 दिवसांचा असताना त्याने पाकिस्तानविरुद्धच्या गुजरणवाला लढतीत वन डे क्रिकेटमध्ये श्रीगणेशा केला.

 … तरच खेळण्याची मुभा

15 पेक्षा कमी वयाचा असणाऱया क्रिकेटपटूला खेळण्याची मुभा देण्यात येऊ शकते. पण आयसीसीकडून एक अट ठेवण्यात आली आहे. त्यानुसार संलग्न बोर्डाने त्या खेळाडूला खेळण्याची परवानगी द्या असे आयसीसीला पत्राद्वारे कळवायला हवे. यानंतर खेळाडूचा खेळण्याचा अनुभव, मानसिक विकास आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दबाव झेलण्याची क्षमता हे पाहून निर्णय घेण्यात येणार आहे.

हसन रझाचा विक्रम कायम राहणार

पाकिस्तानच्या हसन रझा याने कसोटीमध्ये 14 वर्षे व 227 दिवसांचा असताना पदार्पण केले. तसेच 14 वर्षे व 233 दिवसांचा असताना त्याने वन डे क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. तो फैसलाबाद येथे पहिली कसोटी खेळला, तर क्वेटा येथे पहिली वन डे खेळला. 15 वर्षांपेक्षा कमी वयाचा असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा तो एकमेव खेळाडू होता. आता हा विक्रम कायम राहणार आहे.

महिलांचा टी-20 वर्ल्ड कप 2023 मध्ये

आयसीसीने महिलांचा टी-20 वर्ल्ड कप 2022 ऐवजी 2023 सालामध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. हा वर्ल्ड कप नोव्हेंबर 2022 सालामध्ये होणार होता, पण आता दक्षिण आफ्रिकेत होणारी ही स्पर्धा फेब्रुवारी 2023 सालामध्ये खेळवण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या