
आगामी आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपचा एक उपांत्य सामना मुंबईत खेळविला जाणार असल्याचे सूत्रांकडून कळले आहे. जर बीसीसीआयने आखलेल्या वर्ल्ड कपच्या कार्यक्रमात मुंबईत उपांत्य सामना होणार असेल तर राऊंड रॉबीन पद्धतीने खेळविल्या जाणाऱया या स्पर्धेत हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातही उपांत्य सामना होऊ शकतो आणि तो सामना मुंबईच्या वानखेडेवरही खेळवला जाऊ शकतो. त्यामुळे बीसीसीआयवर जर असा बाका प्रसंग आला तर ते नेमके काय करतील, असा प्रश्न आताच उभा राहिला आहे. तसेच पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला आणि त्यांना मुंबईच्या वानखेडेवर खेळावे लागले तर ते खेळतील का, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. असे बिकट प्रसंग आगामी वर्ल्ड कपमध्ये निर्माण होणार असल्यामुळे बीसीसीआयने या प्रश्नांना आधीच सोडवल्याचेही बोलले जात आहे.
यंदाचा वर्ल्ड कप राऊंड रॉबीन पद्धतीने म्हणजेच सहभागी प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध खेळणार. त्यामुळे प्रत्येक संघ किमान नऊ सामने खेळतील आणि स्पर्धेतील अव्वल चार संघ थेट उपांत्य फेरीत भिडतील. बीसीसीआयने आयसीसीकडे पाठवलेल्या आराखडय़ानुसार मुंबईच्या वानखेडेवर एक उपांत्य लढत खेळविली जाण्याची शक्यता आहे. ती लढत पहिली आहे की दुसरी याबाबत अद्याप कळलेले नाही. पण अव्वल चार संघांत पहिल्या आणि चौथ्या स्थानावर असलेल्या संघात पहिली उपांत्य लढत होईल आणि दुसऱया व तिसऱया स्थानावर असलेले संघ दुसऱया उपांत्य लढतीत भिडतील.
जर हिंदुस्थान पहिला आणि पाकिस्तान चौथा आला तर हे दोन संघ उपांत्य फेरीत आमने-सामने येतील. तसेच उभय संघांनी दुसरे किंवा तिसरे स्थान मिळविले तर ते अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी समोरासमोर येतील. मात्र एक संघ पहिला आणि दुसरा संघ दुसऱया किंवा तिसऱया स्थानावर आला तर मात्र हिंदुस्थान-पाकिस्तान उपांत्य फेरीत एकमेकांशी भिडणार नाहीत.
बीसीसीआयचा बी प्लॅन
मुंबईला उपांत्य सामना द्यायचे ठरले तर वानखेडेवर हिंदुस्थान-पाकिस्तान लढतीची शक्यता निर्माण होऊ शकते, याचा अंदाज बीसीसीआयला आला असावा. म्हणून त्यांनी उपांत्य लढतींच्या स्थळांना मुव्हेबल म्हणजे फिरते ठेवण्याची शक्यता आहे. जर हिंदुस्थान-पाकिस्तान उपांत्य फेरीत भिडणार असतील तर ते हा सामना मुंबई सोडून दुसऱया पेंद्रावर खेळवतील आणि तिथे होणारा सामना मुंबईला स्थलांतरीत करतील अशीही तयारी त्यांनी केली असल्याचे कळते. तसेच केवळ पाकिस्तानलाच उपांत्य फेरीत मुंबईत खेळण्याची स्थिती निर्माण झाल्यासही बीसीसीआय तोच फॉर्म्युला वापरू शकते. सध्याचा खेळ पाहता हिंदुस्थान आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत पोहोचण्याचे दावेदार आहेत. बीसीसीआयने या सर्व परिस्थितींचा आढावा आधीच घेतल्यामुळे मुंबईला नक्कीच उपांत्य लढत दिली गेली आहे का, असाही प्रश्न क्रिकेटप्रेमींच्या मनात निर्माण झाला आहे.




























































