रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हवाई हल्ला, 367 ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली; 13 जणांचा मृत्यू, 12 जण जखमी

रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष थांबण्याचे नावच घेत नाही. रशियाकडून सातत्याने युक्रेनवर हल्ले सुरू आहेत. दोन्ही देशांतील संघर्षाचे परिणाम युक्रेनमधील अनेक शहरे भोगत आहेत. अशातच रशियाने आज पुन्हा एकदा युक्रेनवर हल्ला केला. रशियाने युक्रेनवर 367 ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागली असून, आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. तसेच या हल्ल्यात इमारतींचेही मोठे नुकसान झाले आहे.

सैन्याच्या अदलाबदलीदरम्यान रशियाने हा हल्ला केला. कीव, खार्किव्ह, मायकोलाईव्ह, टेर्नोपिल आणि खमेलनित्स्की येथे हे हल्ले झाले. यात या हल्ल्यात झायटोमिरमधील तीन मुलांसह 13 जणांचा मृत्यू झाला आणि 12 जण जखमी झाले. या हल्ल्याला प्रत्युत्तर देत युक्रेनच्या हवाई दलाने 266 ड्रोन आणि 45 क्षेपणास्त्रे पाडली. मात्र या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पायाभूत सुविधांवरही मोठा परिणाम झाला.

कीवमध्ये 11 जण जखमी झाले, तर खमेलनित्स्कीमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दक्षिण युक्रेनमधील मायकोलाईव्ह येथे, रशियन ड्रोन हल्ल्यात 77 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आणि पाच जण जखमी झाले. या हल्ल्यात एका निवासी इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे.

रशियाविरुद्ध अधिक कडक निर्बंध लादण्याची मागणी अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी केली आहे. अमेरिकेचे मौन आणि जगातील इतरांचे मौन पुतिन यांनाच प्रोत्साहन देत असल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

दबावाशिवाय काहीही बदलणार नाही. रशिया आणि त्याचे सहयोगी देश पाश्चात्य देशांमध्ये अशा हत्यांसाठी फक्त सैन्य उभारतील. मॉस्को जोपर्यंत शस्त्रे तयार करण्याची क्षमता आहे तोपर्यंत लढेल, असे युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांचे चीफ ऑफ स्टाफ आंद्री येरमाक यांनी म्हटले आहे.