
थायलंड आणि मलेशियाच्या सीमेजवळ हिंदी महासागरात म्यानमारमधील सुमारे 300 स्थलांतरितांना घेऊन जाणारे जहाज बुडाले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बचाव पथकांनी आतापर्यंत केवळ 10 जणांना वाचवले. समुद्रात तरंगणाऱ्या एका व्यक्तीचा मृतदेह सापडला असून इतर सर्व अद्याप बेपत्ता आहेत. बचाव पथकांकडून बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे.
जहाज बुडाल्यानंतर बचाव पथकांना तात्काळ माहिती मिळू न शकल्याने शेकडो लोक बेपत्ता आहेत. जहाज थाई पाण्यात उलटले असावे, असे मलेशियन अधिकाऱ्यांनी सांगितले. धोकादायक समुद्री मार्ग वापरून सीमापार टोळ्या स्थलांतरितांचे शोषण करण्यात अधिक सक्रिय होत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
वाचवण्यात आलेल्यांमध्ये म्यानमारमध्ये राहणारे काही रोहिंग्या मुस्लिम आहेत. मलेशियन मेरीटाईम एन्फोर्समेंट एजन्सीचे फर्स्ट अॅडमिरल रोमली मुस्तफा यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की ही बोट म्यानमारच्या राखीन राज्यातील बुथिडाउंग शहरातून निघाली होती आणि तीन दिवसांपूर्वी बुडाली. मलेशियाच्या उत्तरेकडील रिसॉर्ट बेट लँगकावीजवळील पाण्यात अनेक वाचलेले लोक सापडल्यानंतर शनिवारी एजन्सीने शोध आणि बचाव मोहीम सुरू केली. बचाव पथकाला म्यानमारच्या एका महिलेचा मृतदेह समुद्रात तरंगताना आढळला. यानंतर घटनास्थळावरून 10 जणांना वाचवण्यात आले आहे.


























































