
अज्ञात हल्लेखोरांनी पोलीस पथकावर केलेल्या गोळीबारात दोन पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. ऑस्ट्रेलियातील पोरेपुंकाह शहरात मंगळवारी दुपारी हा गोळीबार झाला. गोळीबाराच्या घटनेनंतर संपूर्ण शहरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर आरोपींनी पलायन केले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पोरेपुंकाह शहर मेलबर्नपासून 320 किलोमीटर अंतरावर आहे. शहरातील एका खासगी मालमत्तेजवळ तपासासाठी पोलीस पथक गेले असता हा गोळीबार करण्यात आला. पोलिसांनी ताबडतोब सार्वजनिक इमारती आणि जवळील विमानतळ बंद केले. विद्यार्थ्यांना शाळेतच रोखून ठेवण्यात आले होते. त्यानंतर काही तासांनी त्यांना घरी पाठवण्यात आले. नागरिकांनी बाहेर जाऊ नका आणि घरात सुरक्षित रहा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पुढील सूचना मिळेपर्यंत जवळपासच्या शाळा, दुकाने आणि औद्योगिक युनिट्स बंद ठेवण्यात आले आहेत. दरम्यान जखमी पोलीस अधिकाऱ्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.