
रशियाकडून युक्रेनवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच युक्रेनने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना लक्ष्य केले. युक्रेनने पुतिन यांच्या हेलिकॉप्टरवर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने पुतिन या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. रशियातील कुर्स्कमधून पुतिन यांचे हेलिकॉप्टर जात असताना हा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
रशियन हवाई संरक्षण यंत्रणेने राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरच्या मार्गावर पोहोचण्यापूर्वीच ड्रोनला अडवून नष्ट केले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. रशियन सुरक्षा यंत्रणेकडून या घटनेची चौकशी सुरू आहे. सुरक्षा संस्था युक्रेनियन ड्रोनने कुर्स्कच्या हवाई क्षेत्रात कसे घुसले आणि हा हल्ला हत्येचा प्रयत्न होता की दबावतंत्राचा? याचा तपास करत आहेत. युक्रेन सरकार किंवा लष्कराकडून या ड्रोन हल्ल्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.