
पश्चिम जपानी बेट क्यूशूवर रविवारी तीन वेळा साकुराजिमा ज्वालामुखीचा उद्रेक झाला. यात 4 किमी उंचीपर्यंत लाव्हा उसळला. यामुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या (जेएमए) माहितीनुसार, पहाटे 1 वाजता, त्यानंतर पहाटे 2.30 आणि सकाळी 8.50 वाजता असा तीन वेळा ज्वालामुखीचा उद्रेक झाला.
कागोशिमा शहर आणि आसपासच्या भागात राखेचा जाड थर साचू लागला, ज्यामुळे दृश्यमानता लक्षणीयरीत्या कमी झाली. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव जवळजवळ 30 विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली. उड्डाणे रद्द झाल्याने प्रवासी विमानतळावरच अडकून पडले, काही प्रवाशांना त्यांचा प्रवास पुढे ढकलावा लागला.
शहर प्रशासनाने लोकांना घरातच राहण्याचा, बाहेर पडताना मास्क घालण्याचा आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. शास्त्रज्ञ रडार आणि उपग्रहांचा वापर करून या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत.



























































