लोकांच्या निषेधामुळे ई-कॉलिंग सुविधा झाली फ्री, वाचा सविस्तर बातमी

1036

हिंदुस्थानातील इंटरनेट विश्वात जिओने एक क्रांती घडवून आणली. इंटरनेट सुविधेसोबत फ्री कॉलिंग आणि मेसेजिंग ही सुविधा दिल्यामुळे ग्राहक जिओवर तुटून पडले. सध्या जिओने आपली फ्री कॉलिंग सुविधा मागे घेतली असून त्यावर प्रतिमिनिट सहा पैसे इतका दर आकारला जात आहे. हा दर म्हणजे कॉलसाठी लागणारा कर असल्याचं स्पष्टीकरण जिओने दिलं आहे. अर्थात यामुळे काही ग्राहकांनी नाराजीही व्यक्त केली आहे.

साधारण असाच एक प्रकार लेबनॉन येथे घडला असून तिथे मात्र या कराविरोधात जनआंदोलन झालं आहे. लेबनॉनमध्ये व्हॉट्सअॅप आणि फेसबुक व्हिडीओ कॉलिंगवर कर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. देशावर असलेल्या कर्जाचा भार कमी करण्यासाठी देशात सर्वाधिक वापरात असलेल्या या सुविधेवर कर लावण्यात आला होता. पण, लेबनिज जनतेचा या करआकारणीला विरोध होता. कारण या कराची किंमत दरमहा 150 रुपये इतकी होती. त्यामुळे जनतेने याचा विरोध केला.

सुरुवातीला हे आंदोलन कमी प्रमाणात सुरू होतं. हळूहळू याला मिळत जाणारा पाठिंबा आणि त्यामुळे होणारी हिंसा पाहून लेबनॉन शासनाने कर आकारणीचा निर्णय रद्द केला. या देशात फक्त दोनच मोबाईल सेवा असून त्या दोन्ही सरकारच्या मालकीच्या आहेत. त्यामुळे यांवर कर आकारणी सोप्पी होईल, असा इथल्या शासनाचा अंदाज होता. पण, जनतेच्या तीव्र विरोधामुळे त्यांना इंटरनेट कॉलिंग सुविधा पुन्हा मोफत द्यावी लागली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या