
नव्या मुख्यमंत्र्यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतरही मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच असून नागा बहुल उखरूल जिह्यात मंगळवारी पहाटे आगडोंब उसळला. काही समाजपंटकांनी एका गावात धुडगूस घालत 25 ते 30 घरांना आगी लावल्या. तसेच हवेत अंदाधुंद गोळीबार केला. खबरदारी म्हणून सरकारने जिह्यात संचारबंदी लागू केली असून इंटरनेट सेवा पाच दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहे.
उखरूलमधील लिटान गावात शनिवारी रात्री सात ते आठ जणांनी तंगखुल नागा समुदायातील एका व्यक्तीवर हल्ला केला आणि वादाची ठिणगी पडली. हा वाद चर्चेतून मिटवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र रविवारी बैठक झाली नाही. सोमवारी मध्यरात्री काही लोकांनी तांगखुल नागा समुदायाच्या घरांना आग लावली. त्यास प्रत्युत्तर म्हणून नागा समुदायाने कुकाRच्या घरांना लक्ष्य केले.



























































