एटीएम फोडणारी आंतरराज्य टोळी गजाआड

विटा येथील एटीएम फोडणाऱ्या आंतरराज्य टोळीला मोठ्या शिताफीने पकडण्यात आले. विटा पोलिसांनी विटा-तासगाव रस्त्यावर ही कारवाई केली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करीत अटक केली आहे. त्यांच्याकडून सहा लाख 20 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सैफुल दुल्ली खान (वय 37), निसियुम नियाज अहमद (वय 24) व हसन रहेमत (वय 53, सर्व रा. हरियाणा) अशी या संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएम फोडून पलायन केलेली टोळी विटा पोलीस स्टेशनच्या हद्दीत विटा–तासगाव रस्त्यावरून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीवरून पोलीस पथक गस्त घालत असताना येथील एच. पी. पेट्रोलपंपासमोर तासगावकडून चारचाकी गाडी येत होती. या गाडीला थांबवून पोलिसांनी गाडीची झडती घेतली. यावेळी एका प्लॅस्टिकच्या कागदामध्ये दोन वेल्डिंग करण्यासाठी वापरण्यात येणारे सिलिंडर, गॅस कटर, रबर पाईप, रेग्युलेटर, दोन चाकू, कागदपत्रांच्या फाईली, तीन मोबाईल मिळाले.

याबाबत अधिक तपास केला असता सर्व साहित्य एटीएम फोडण्यासाठी वापरल्याचे समोर आले. आरोपींनी करमाळा येथील एटीएम फोडल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 6 लाख 20 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, विटा पोलिसांनी सर्व आरोपींना करमाळा पोलिसांच्या ताब्यात दिले. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.