
> शुभांगी बागडे
कोरोनाकाळात अनेक पातळीवर सर्वच घटकांनी संघर्ष केला. जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रावर कोरोनाने आपले जाळे टाकले. या काळात इतर अनेक क्षेत्रांप्रमाणे नाटय़क्षेत्रही ठप्प झाले. न भूतो न भविष्यती अशा परिस्थितीला सामोरे जावे लागले. हळूहळू हा निराशजनक काळ सरला आणि 22 ऑक्टोबर 2021 पासून हे सांस्कृतिक क्षेत्र पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी सज्ज झाले. नाटय़क्षेत्रातील प्रत्येक घटक ही तिसरी घंटा ऐकायला आतुर झाला होता. रंगभूमीचे पाईक असणाऱ्या अशाच प्रयोगशील आणि दिग्गज कलाकारांपैकी एक म्हणजे मराठी बाणाकार अशोक हांडे. या नव्या पर्वाचं स्वागत करत प्रेक्षकांनी मराठी बाणाला हाऊसफुल्ल असा प्रतिसाद दिला. यानिमित्त अशोक हांडे यांच्याशी केलेली बातचित.
दीड वर्षानंतर मराठी बाणाच्या प्रयोगाला हाऊसफुलची पाटी बघून कोणत्या भावना दाटून आल्या.
1 नोव्हेंबर 2005 मध्ये मराठी बाणाला सुरूवात झाली. त्या दिवशी लक्ष्मीपूजन, दिवाळी पहाट होती. सलग 15 वर्षे सुरू असलेला हा प्रवास 2000 प्रयोग झाल्यानंतर कोरोनामुळे काही काळ थांबला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतरचा पहिला प्रयोग 4 नोव्हेंबर 2021 रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच दिनानाथ नाटय़मंदिरात मराठी बाणाचा प्रयोग सादर झाला. रंगमंचाचा पडदा सरताक्षणी प्रेक्षकांच्या टाळ्यांचा जो कडकडून प्रतिसाद मिळाला तो म्हणजे आमच्यासाठी आशीर्वाद, प्रेरणा आहेत. आमचा आत्मविश्वास दुणावणारा असा तो क्षण होता. त्या टाळ्यांमध्ये प्रेक्षकांना आम्ही भेटल्याचा किती मोठा आनंद झाला आहे याची प्रचीती आम्हाला आली आणि सगळ्या कलाकारांची ऊर्जा शतपटीने वाढली. ज्या प्रेक्षकांपासून आम्ही दुरावलो होतो त्या रसिकांसमोर कला सादर करताना आम्हालाही एक वेगळी ऊर्जा मिळाली. ही रंगभूमीची खूप मोठी ताकद आहे. त्यानंतरचे सगळेच प्रयोग हाऊसफुल झाले आहेत. त्यामुळे ही सकारात्मक सुरूवात आहे असे वाटते.
सध्या प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद लाभत आहे.
कोरोनातंर प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून आम्ही भारावून गेलो. सध्या प्रेक्षकांची उपस्थिती 50 टक्के असली तरी प्रयोग हाऊसफुल होत असल्याचा आनंद निराळा असतो. अनेकांना तिकीट न मिळाल्यामुळे निराशेने परत जावे लागते. त्याचे वाईट वाटते. दीड वर्षानंतर त्या ऊर्जेने सादर झालेले प्रयोग पाहून प्रेक्षकही तितकेच भारावले. अनेकांनी याची पोच दिल्यानंतर मला एक जाणवलं ते म्हणजे प्रेक्षक हीच आमची खरी ऊर्जा आहे. हे नातं किती मोठं आहे. हीच आमची खरी दिवाळी असं माझ्यासारख्या प्रत्येक कलाकाराला वाटलं तर नवल नाही. प्रेक्षकांच्या भरभरून प्रतिसादामुळे आमची दिवाळी लखलख चंदेरी झाली असेच म्हणायला हवे. मराठी बाणा हा केवळ रंगमंचावरील 125 कलाकारांचा प्रयोग नसून नाटय़गृहातील प्रत्येक प्रेक्षक यात सामावलेला असतो. मराठी बाणाने सगळ्यांचीच दिवाळी आनंदित केली.
कलाकारांच्या एवढा मोठय़ा चमूची जबाबदारी कोरोनाकाळात कशी निभावली.
कोरोनाची झळ प्रत्येकालाच बसली. नाटय़क्षेत्र तर संपूर्णत: ठप्प झालं. कलाकारांना याचा खूप मोठा सेटबॅक बसला. प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या होत्या. त्या काळात चौरंगच्या प्रत्येक कलाकाराला दर महिन्याला एक कुटुंबप्रमुख म्हणून थोडीशी का होईना मदत माझ्याकडून करण्यात आली. माझ्या प्रत्येक कलाकाराला सांभाळणं ही माझी जबाबदारी समजून केलेली ही मदत होती. त्यामुळे प्रयोग सुरू होण्याच्या बातमीने त्यांच्यामध्ये उत्साह संचारला.
एवढय़ा मोठय़ा चमूला एकत्र राखण्याची कसरत नेमकी कशी साधता.
आमचा प्रत्येक कलाकार हा मनाने मराठी बाणाशी जोडलेला आहे त्यामुळे त्यांच्यातही ती आपुलकी, प्रेम दिसतंच. मराठी बाणाचा हा 125 जणांचा समूह आहे. यात सादरीकरणानुसार वेगवेगळे ग्रुप आहेत. साउंड, लाइट, कपडेपट, मेकअप, नर्तक, वादक, गायक, रंगमंच कामगार, ड्रायव्हर ही वेगवेगळी टीम आहे. या सगळ्यांच्या सादरीकरणात एकसंधपणा आणण्याचं सूत्रधाराचं काम माझं आहे. त्यामुळे सगळ्याची लय, नाद एकच आहे जी सादरीकरणातून प्रेक्षकांना जाणवते. दिग्दर्शक, निर्माता याचं हेच काम असतं. त्यामुळे कुटुंबप्रमुख म्हणून मी माझी भूमिका पार पाडत असतो.
सध्या प्रयोगांची आर्थिक घडी कशी बसवत आहात.
कोरोनानंतर सर्वच पातळ्यांवर नुकसान सहन करावं लागलं. दीड वर्षात प्रयोग न झाल्याने आर्थिक गणित संपूर्णत: कोलमडलेलं आहे. प्रयोग सुरू झाल्यानंतर हे गणित सुरळीत होईल अशी अपेक्षा करावी तर पन्नास टक्के उपस्थितीच्या निर्बंधामुळे प्रयोग तोटय़ात आहेत असेच म्हणावे लागेल. मात्र प्रेक्षकांना आणि आमच्या कलाकारांच्या मनाला उभारी मिळावी आणि कुठेतरी नव्याने सुरूवात व्हावी याकरता मराठी बाणाचे प्रयोग सुरू आहेत. सध्याचे प्रयोग म्हणजे प्रमोशन हाच दृष्टिकोन ठेवून करत आहोत. 50 टक्केच्या उपस्थितीत पुणे, नाशिक सारखे दौरे करणंदेखील शक्य नाही. कलाकारांनी त्यांचं मानधन 50 टक्के केलं आहे. मात्र त्याबरोबर इतर खर्चही आहेत. त्यामुळे भागत नाही.
प्रेक्षकांची 100 टक्के उपस्थिती आणि अन्य नियम याबद्दल काय सांगाल
आर्थिक तोटा होत असल्याने येत्या काळात निर्बंध हटवून नाटय़गृहांमध्ये 100 टक्के आसनक्षमता करण्यासाठी मान्यता द्यावी अशी शासनाकडे नम्र विनंती आहे. सध्या काही ठिकाणी नाटय़गृहाची भाडे सवलत मिळण्यासाठी 400 रुपये तिकीट दराची मर्यादा आहे परंतु मराठी बाणासारखा मोठय़ा संचाचा कार्यक्रम करताना हा दर परवडत नाही. त्यामुळे ही मर्यादा किमान 500 रुपयांपर्यंत वाढवावी अशी माझी मागणी आहे. तसेच नाटय़गृहात सध्या असलेली भाडे सवलत 31 डिसेंबर 2022 पर्यंत सुरू ठेवावी. याबरोबरच पूर्वीसारखे कॉन्ट्रक्ट शो आता होत नाहीत. यात जीएसटीचा मुद्दा येतो. त्यामुळे गेल्या काही वर्षांत ते नुकसान आम्ही सोसत आहोतच. यशवंतराव चव्हाणांच्या काळात थिएटरमधील लाइव्ह कार्यक्रमांवरील मनोरंजन कर रद्द करण्यात आला होता. परंतु जीएसटीची कुऱ्हाड कोसळल्यामुळे या क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. शिवाय अशा संस्थात्मक कार्यक्रमांची प्रथाच बंद झाली आहे.
एवढय़ा मोठय़ा कार्यक्रमाचे पुन्हा नियोजन करताना कोणती आव्हानं होती.
प्रयोग सादर करण्याआधी आम्ही एकच दिवस रिहर्सल केली. इतक्या दिवसाच्या विश्रांतीनंतर फार वेळ सराव करणं जमत नसल्याचं लक्षात आलं. काहींची दमछाकही होत होती. मात्र पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा जो प्रतिसाद लाभला त्याने सगळ्यांच्या शरीरात एक वेगळं चैतन्य निर्माण झालं. रंगदेवता सारं काही करून घेते याची प्रचिती आली. कोरोनाआधी आणि आता अशा प्रयोगांमधली ती ऊर्जा समान आहे. नवे प्रयोग सादर करण्याआधी पूर्वतयारी करताना लक्षात आलं की, बरंचसं साहित्य खराब झालं आहे. नऊवारी साडय़ा, दागिने, ड्रेसेस, वेशभूषा, मेकअपचे साहित्य, इतर प्रॉपर्टी या सगळ्याचीच नव्याने खरेदी करावी लागली. साउंट, लाइट यातलं बरचसं साहित्य खराब झालं होतं. नेपथ्याची रंगरंगोटी करून ते नव्याने तयार करावे लागले. बसेस, टेम्पो यांची दुरुस्ती करून घ्यावी लागली. अशा अनेक पातळ्यांवर तयारी करावी लागली. नुकसान झालंच परंतु पुन्हा सुरूवात करत आहोत, याचाच आनंद खूप मोठा आहे.
रंगभूमीवर पाऊल ठेवताना कोणत्या भावना दाटून आल्या
खरंतर कोणताही कलाकार रंगभूमीपासून कधीच दुरावत नाही. कोरोनाकाळामुळे रंगभूमीपासून दुरावलो असलो तरी मनाने तिथेच होतो. 4 नोव्हेंबर रोजी दिनानाथ नाटय़गृह आणि 5 नोव्हेंबर रोजी प्रबोधनकार नाटय़गृह या दिवाळीतील प्रयोगांमध्ये जो अनुभव घेतला तो अवर्णनीय आहे. खरंतर या काळात नाटय़गृहंदेखील अद्ययावत होऊन आमच्या स्वागतासाठी पुन्हा उभी राहिल्याचा प्रत्यय आला. दीनानाथ मंगेशकर नाटय़गृह, प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृह, विष्णूदास भावे नाटय़गृह, गडकरी रंगायतन इथल्या नियोजनाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. दिड वर्षे थिएटर्स बंद असताना दिवाळीला ती सर्व तितकीच लखलखीत दिसली. ही आमच्यासाठी दिवाळीभेट होती. यात महानगरपालिकांचा वाटा मोठा आहे. आता प्रेक्षक आणि आम्ही हे अतुट नातं पुन्हा सुरू झालं आहे. त्यात खंड पडू नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना.





























































