जिद्दी ‘अनन्या’ डॅशिंग ‘पालवी’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगेश दराडे 

नऊ वर्षांपूर्वी ‘दुर्वा’ या मालिकेतून हृताने अभिनयात पदार्पण केले. त्यानंतर ‘फुलपाखरू’ आणि ‘मन उडू उडू’मुळे ती तरुणाईच्या गळय़ातील ताईत बनली. चित्रपटात पदार्पणासाठी इतका उशीर का झाला, याबाबत ती म्हणाली, उशीर झालाय असं मला वाटत नाही. योग्य वेळी योग्य गोष्टी होतात. मोठय़ा पडद्यावर पदार्पणासाठी चांगली संधी हवी होती, जी ‘अनन्या’ने मला दिली.

हृताचा ‘अनन्या’ हा चित्रपट 22 जुलैला तर ‘टाईमपास 3’ हा चित्रपट 29 जुलैला प्रदर्शित होतोय. ‘अनन्या’मध्ये ती अपघातात दोन्ही हात गमावलेली आणि स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी धडपडणारी तरुणी साकारतेय तर ‘टाईमपास 3’ मध्ये तिचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळणार आहे. याबाबत ती म्हणाली, अनन्याचा प्रवास माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होता. भूमिकेसाठी शारीरिक मेहनतीसोबत मानसिकदृष्टय़ा खंबीर राहणे आवश्यक होते. वजन कमी करावे लागले. विशेषतः फ्लेक्सिब्लिटीवर मेहनत घ्यावी लागली. योगा आणि व्यायामाचे प्रशिक्षण सुरू होते. दिग्दर्शक प्रताप फड यांची मोलाची साथ मिळाली. अशा चॅलेंजिंग भूमिका साकारणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. चित्रपटसृष्टीतील करिअरच्या सुरूवातीलाच माझ्या वाट्याला इतकी दमदार भूमिका आली.

पुढे ती म्हणाली, आजवर मी शांत, सोज्वळ मुलीची भूमिका साकारलीय, मात्र पालवी ही डॅशिंग मुलगी आहे. तिचे हावभाव, अशुद्ध भाषा हे एक वेगळंच चॅलेंज होते. दोन्ही भूमिकांच्या निमित्ताने कलाकार म्हणून मला स्वतःला आजमावून पाहता आले. परिस्थितीपुढे हार न मानण्याची अनन्याची जिद्द आणि पालवीचा आत्मविश्वास आपल्याला भावल्याचे तिने सांगितले.

‘मन उडू उडू’ घेणार निरोप!

‘मन उडू उडू’ मालिकेत हृताने साकारलेल्या दीपू या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ही मालिका लवकरच निरोप घेणार असल्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे. याबाबत विचारल्यावर हृता म्हणाली, ‘होय, 13 ऑगस्टला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होतोय. गेले वर्षभर प्रेक्षकांनी इंद्रा आणि दीपूला भरभरून प्रेम दिले. आता त्यांच्या आयुष्यात नवी सुरुवात होतेय. 300 भागांनंतर एका चांगल्या टप्प्यावर मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेय. ही मालिका प्रेक्षकांच्या स्मरणात कायम राहील.’

…म्हणून स्वतःला नशीबवान समजते!

मालिका, चित्रपट, वेब सीरिज आणि नाटक या चारही माध्यमांत हृताने काम केले आहे. मला अभिनय करणे मनापासून आवडते. चारही माध्यमात काम करायला मिळाले म्हणून मी स्वतःला नशीबवान समजते. माध्यम कोणतेही असो मी तितक्याच प्रामाणिपपणे काम करते आणि आलेल्या भूमिकेला न्याय देते, असे तिने सांगितले.