
मुलाखती – संजीवनी धुरी-जाधव
मराठी रंगभूमी… अस्सल कलावंताचा ध्यास आणि आस… आपल्या अंतर्मनाची अभिव्यक्ती सादर करण्यासाठी हे हाडाचे कलाकार नेहमी रंगभूमीचीच निवड करतात… कुणी लिखाणातून स्वत:ला चाचपडण्याचा प्रयत्न करतंय.. कुणी स्वत:ला रिलेट करून नव्या पिढीच्या अंतर्मनात पोहोचण्याचा प्रयत्न करतंय तर कुणी काहीतरी वेगळं करून बदल करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे नव्या दमाच्या या नाटय़कर्मींना काय वाटतंय ते जाणून घेऊया..
लिखाणातून स्वतःला शोधतेय! – मयुरी देशमुख

खरंतर आता एकच नाटक पूर्ण लिहून झालंय आणि ते बाहेर आले आहे. बाकीचे जे काही लिखाण आहे ते आता सुरू आहे. येता जाता कल्पना डोक्यात येतात, ही प्रक्रिया असते ती फार कठीण असते. विशेष करून तुम्ही नट आणि लेखक, पण असाल तेव्हा ती जास्त कठीण असते. प्रक्रिया म्हणाल तर डोक्यात बऱयाच गोष्टी, विषय चालू असतात. काही गोष्टी आजूबाजूला पाहतो त्यातून ग्रहण केलं जातं, काहीवेळेला प्रत्यक्ष जीवनातील अनुभव नाटय़रूपात कसे असतील याचे कल्पना आपोआप करायला लागतो. त्यामुळे मला वाटतं लेखकाची प्रोसेस सुप्त स्वरूपाची आहे. मी ‘डीअर आजो’च्या लिखाणाविषयी सांगू शकते. माझी सुरुवात अशी झाली की, कथा सुचण्याआधी मला पात्र आधी सुचले आणि नंतर त्यांच्याभोवती हे नाटक मी गुंफत गेले. मुंबई विद्यापीठातून मी मास्टर इन थिएटर आर्टस् केलेले आहे. या नाटय़शास्त्र्ााच्या दोन वर्षांचे जे प्रशिक्षण आहे त्याच्यात आम्हाला नाटय़लेखन हा एक विषय होता. सुरुवात मी सराव म्हणून लिहिलं. आपल्याला जे सांगायचं ते येतंय का हे चाचपडण्यासाठी सुरुवात केली. लिखाणाची पद्धत सशक्त पण वाटली.लिखाण करताना मी कोणावर अवलंबून नव्हते. ‘आय वॉझ द किंग ऑफ माय वर्ल्ड’ ती फिलिंग आहे ती कलाकाराच्या विरुद्ध असते, कारण कलाकार नेहमी अवलंबून असतो एका दिग्दर्शकावर, लेखकावर, निर्मात्यावर. त्या अर्थाने हे भिन्न होतं, मुक्त होतं त्यामुळे एका अर्थाने मी त्याचा आनंद घेत होते. म्हणूनच मी ते नाटक पूर्ण केले. त्याच्यानंतरही माझी लिखाणाची इच्छा आहे, कारण मला त्यातला आनंद सापडला आणि मला तो अजून अजून सापडत जावा. सध्या डोक्यात दोन-तीन विषय आहेत. एक नाटक, सिनेमा आणि वेबसीरिज आणि मी तेच चाचपडतेय. पण त्याचबरोबर मी इतरही माध्यमांचा अभ्यास करतेय, कारण वेगवेगळ्या माध्यमांचा प्रभाव वेगवेगळा आहे. सध्यातरी मी सगळीकडे चाचपडून बघणार आहे. येत्या दोन-चार वर्षांत मला माझा प्लस पॉइंट कळेल आणि कुठे मी कम्फर्टेबल होऊ शकते. त्याचा शोध मला लागेल.
व्यावसायिक नाटकातून पदार्पण -प्रसाद ओक

चित्रपटांमुळे काही काळ नाटकापासून दूर राहिलो, पण आता ‘तू म्हणशील तसं’ या नाटकातून कमबॅक केलं आहे. बरीच वर्षे व्यावसायिक नाटक दिग्दर्शित करण्याची संधी या नाटकाच्या निमित्ताने सापडली. त्यामुळे नाटय़दिग्दर्शनाचे फार समाधान वाटतंय. पण चित्रपट दिग्दर्शन आणि नाटय़दिग्दर्शन ही दोन्ही माध्यमं वेगळी आहेत. नाटक बसवण्यासाठी महिन्याभराचा कालावधी लागतो, तर चित्रपट तयार करण्यासाठी वर्ष लागतात. त्यामुळे दोन्ही माध्यमं आणि त्यावर काम करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. खरंतर प्रशांत दामले आधीच्या बॅचचा संकर्षण नंतरच्या बॅचचा आणि मी मधल्या बॅचचा त्यामुळे प्रशांतला काय हवंय आणि संकर्षणकडून काय करवून घ्यायचे आहे हे मी चांगले समजू शकत असल्याने त्याचा मी उत्तम मेळ घालू शकतो. प्रशांत दामले यांना रंगभूमीवरचा हुकमी एक्का बोलतात. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. फार मस्त वाटतंय. प्रशांत दामले यांची या नाटकाला निर्मिती असणं म्हणजे सोने पे सुहागा आहे. पण त्याचबरोबर ती जबाबदारी आहे, कारण या नाटकात प्रशांत दामलेंचं नाक निर्माता म्हणून येतं. या नाटकात त्यांनी अभिनय केलेला नाही. त्यामुळे माझ्याकरची जबाबदारी ही दुप्पट आहे.
पुस्तकं आवर्जून वाचतो -संकर्षण कऱ्हाडे

खरंतर नाटक लिहिणं ही काही ठरवून केलेली प्रोसेस नव्हती. फार नाही, पण महिन्याभराचा वेळ गेला. ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाचं लेखन मी केलंय. मुळातच मला गप्पीष्टपणा आवडतो. त्यामुळे गप्पा मारल्यासारखे सहज सोपे संवाद सुचत गेले. माझ्या मते, एखाद्या विषयावर मेहनत घेणं म्हणजे काय तर त्यात सतत असणं गरजेचे आहे. प्रशांत दामले यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव फारच सुंदर आहे. लोकांना ते नाटक आवडतंय, विषय आवडतोय, कामं आवडतायत ही जमेची बाजू झाली, पण आज प्रशांत दामलेंच्या शिस्तीचे दडपण येते, सध्या मी खवय्ये करतोय आणि नाटक आता लिहिले, एक सिनेमा लिहिलाय तो फेब्रुवारीमध्ये करायचा चालू आहे. वाचन मला प्रचंड आवडतं आणि नेहमी मी निर्लज्जपणे सांगतो, मला जर कोणाला भेटवस्तू द्यायची असेल तर प्लीज पुस्तकं द्या. पुस्तकं हक्काने मागून घेतो आणि मिळालेली, घेतलेली पुस्तकं आवर्जून वाचतो, पण वेळात वेळ काढून शूटिंगच्या सेटवर झोपायच्या आधी ठराविक ध्येय ठेवून पुस्तकं नक्कीच वाचतो.


























































