
>> अश्विनी पारकर
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल कळाल्यावर तो त्याच्या सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील सुर्डी या गावात गेला तेव्हा संपूर्ण गाव त्याच्या स्वागतासाठी हजर होते. प्रत्येकजण त्याचे अभिनंदन करत होता. आपला मुलगा ‘सायेब’ झाला म्हणून आईवडिलांचे डोळे पाणावलेले. मुलगा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाला म्हणजे काय झाले याची कल्पनाही त्या अशिक्षित आईवडिलांना नव्हती. बँडमध्ये वाजंत्री म्हणून काम करणाऱया वडिलांच्या मनाला आपलं लेकरू शिकून इतकं मोठ्ठं होईल असा विचारही शिवला नव्हता, पण ‘जीवन दगडे’ याने मात्र आईबाबांनी न पाहिलेले स्वप्नही प्रत्यक्षात आणले. त्याच्या जिद्दीची ही कहाणी.
- केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा का द्यावीशी वाटली?
– मी पदवी शिक्षणानंतर राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालो. त्यानंतर मला श्रेणी वन अधिकारी पदावर काम करण्याची संधी मिळाली. माझ्यातील क्षमतांची मला पूर्ण जाणीव होती. मी आणखी प्रयत्न केले तर मी याहीपेक्षा मोठय़ा पदावर जाऊ शकेन असा आत्मविश्वास मला होता. सुप्रसिद्ध वैज्ञानिक आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम आणि ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श माझ्या नजरेसमोर होता. माझ्या वरिष्ठांनीही माझ्या आत्मविश्वास द्विगुणीत केला. माझ्या मित्रमंडळींचा मला पाठिंबा होता. त्यामुळे पुढील प्रवासाचा मार्ग मी निश्चित केला. माझ्या पदाचा मी राजीनामा दिला व केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी कराव्या लागणाऱया तयारीची रूपरेषा आखली. त्यानंतर अभ्यासाला सुरुवात केली.
- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या तयारीचा काळ नेमका कसा होता? नोकरीचा राजीनामा दिल्याने घरातील परिस्थितीवर त्याचा परिणाम झाला का?
– माझ्या आईवडिलांशिवाय घरातील कोणालाच माझा निर्णय पटला नव्हता. माझ्या आईवडिलांनी माझ्या निर्णयात मला नेहमीच पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मला मानसिक बळ मिळाले. आर्थिक दृष्टिकोनातून मी थोडे नियोजन केले होते. तसेच मित्रमंडळींचीही मदत झाली. या पुण्यातील ‘डॉक्टर बाबासाहेब रिसर्च इन्स्टिटय़ूट’ या संस्थेची स्कॉलरशिप मिळविण्यात मी यशस्वी झालो. त्यातून माझ्या शिक्षणाचा आणि राहण्याचा खर्च होऊ लागला. त्यांनी मला या परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीला पाठवले होते. तिथे माझ्या रीतसर शिकवणीला सुरुवात झाली. मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांची तयारी व परीक्षेत अपेक्षित असलेल्या प्रश्नांवर विशेष भर मी दिला होता. काही आर्थिक कारणांमुळे मला पुढे दिल्लीतील शिकवणीही सोडावी लागली, पण या वर्षी नाहीतर पुढच्या वर्षी उत्तीर्ण व्हायचेच ही जिद्द मी मनाशी पक्की केली होती. ज्यावेळी परिस्थितीचा बाऊ न करता त्यातून मार्ग काढण्याचा विचार तुम्ही करता त्यावेळी तुम्हाला तुमची वाट सापडत जाते.
- तुझी यशाची वाट तू कशी शोधलीस? यामागची प्रेरणा काय?
– मी जसं म्हटलं, वडिलांना वाजंत्री म्हणून काम करताना पाहून माझ्या मनाला फार वेदना व्हायच्या. त्यांना सन्मानाचं आयुष्य मिळावं असं मला वाटायचं. घरच्या परिस्थितीची ते माझ्यासाठी घेत असलेल्या कष्टांची मला जाणीव होती. त्यांनीही घरातील आर्थिक परिस्थितीचे चटके मला कधी जाणवू दिले नाहीत. माझ्या शिक्षणासाठी जे करणे शक्य होते ते त्यांनी केले. माझे शालेय शिक्षण गावातील शाळेत झाले. त्यानंतर दयानंद महाविद्यालयात बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे पुणे महाविद्यालयात कृषिशास्त्रात मी पदवी घेतली. माझ्या अनेक मित्रांना मी प्रगती करताना पाहत होतो. आपणही जीवनात यशस्वी होऊ शकतो असे मला वाटायचे. त्यासाठी मी नेहमी माझ्यातील चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करायचो. मला माझ्या परिस्थितीविषयी मित्रमंडळीना सांगणे योग्य वाटायचे नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या वाईट परिस्थितीचा जास्त विचार करता किंवा त्याविषयी सतत बोलत राहता तेव्हा तुम्ही स्वतःला कमकुवत करत असता किंवा तुम्ही स्वतःला कमकुवत समजता असा त्याचा अर्थ होतो. मला हे मान्य नव्हते. आपल्यातील क्षमतेवर लक्ष केंद्रित करणे आणि मनात वाईट विचारांना थारा न देणे हा मूलमंत्र मी नेहमी पाळत आलो आहे. त्यामुळेच मी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊ शकलो.
- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वन संरक्षक विभागाचीच परीक्षा द्यावी असे का वाटले?
– माणसं आपल्या हक्कांसाठी भांडू शकतात. प्राणी किंवा वन्य जीव ते करू शकत नाहीत. श्रेणी वन अधिकारी पदासाठी निवड झाल्यानंतर काम करताना मला वन्य जीवन आणि वन्य प्राणी याबद्दल आस्था निर्माण झाली. त्यातूनच पुढे याच विषयात आणखी भरीव काम करण्यासाठी मी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वन संरक्षक विभागाची परीक्षा देण्याचे ठरवले.
- वन्य जीव व पर्यावरण यासंदर्भात काय कार्य करायचे ठरवले आहेस?
– वन्य संरक्षण आणि संवर्धन हा सद्यकाळातील महत्त्वाचा प्रश्न आहे. जागतिकीकरण आणि लोकसंख्यावाढीमुळे वनांचा ऱ्हास होतो आहे. जंगल क्षेत्रातील आदिवासी जमाती, त्यांचे प्रश्न यासाठीही मला कार्य करायचे आहे. त्यांच्या संवर्धनासाठी तसेच वन विभागाच्या कामकाजात सुधारणा घडवण्यासाठी कार्यक्रम करण्याची माझी इच्छा आहे.
- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी आहे असे तुला वाटते का? यामागची नेमकी कारणे काय वाटतात?
– हे खरं आहे की, राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थींपेक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊ इच्छिणाऱया विद्यार्थ्यांचे प्रमाण शहरी भागापेक्षा कमी आहे. यामागे ग्रामीण भागातील मुलांना मिळणाऱया संधीचा अभाव आणि ग्रामीण वातावरण हे मोठय़ा प्रमाणावर कारणीभूत आहे. ग्रामीण भागात माझ्यापेक्षाही हुशार विद्यार्थी आहेत, पण त्यांना शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी शैक्षणिक सुविधा उपलब्ध असतात. त्यांना शैक्षणिकदृष्टय़ा पोषक वातावरण मिळाले तर हे विद्यार्थीही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तम कामगिरी बजावतील असा मला विश्वास आहे.





























































