मुलाखत : सेंद्रिय शेतीतील हिरकणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अश्विनी पारकर 

रासायनिक खतांनी शेतजमिनीवर आणि आरोग्यावर दुष्परिणाम होत असताना सेंद्रीय शेतीकडे शेतकर्‍यांनी कल वाढवण्याची गरज आहे. नेमके हेच हेरून  लातूर जिह्यातील भोईसमुद्रगा या गावात  मंगलाताई वाघमारे यांनी पूर्णपणे सेंद्रीय शेती करण्यास सुरुवात केली. सेंद्रीय शेतीचे फायदे सांगताना त्यांचे शब्द थांबत नाहीत. सेंद्रीय शेतीत मुरलेल्या या शेतकरी महिलेने आपल्यासोबतच गावातील महिलांचाही याच माध्यमातून विकास करण्याचा विडा उचलला आहे.

सेंद्रीय शेतीचा तुमचा प्रवास नेमका कसा सुरू झाला?

मी बारावीपर्यंत शिकलेली… सेंद्रीय शेतीसोबत ओळख होण्याआधी मी रासायनिक शेतीच करत होते. पण एकदा लातूरच्या स्वयंशिक्षण केंद्रातील प्रशिक्षक आमच्या गावाला भेट देण्यास आले. त्यांनी सेंद्रीय शेती व इतर व्यवसायांचे महत्त्व आम्हाला पटवून दिले. मलाही ते पटले. त्यानंतर मी त्यांच्या दहा दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाले. तेथे मला सेंद्रीय शेती कशी करावी इथपासून इतर व्यवसायांची इत्थंभूत माहिती मिळाली. त्यानंतर मी शिवणकाम, ब्युटीपार्लर या जोडव्यवसायांसोबत सेंद्रीय शेती करू लागले. कोबी, टॉमेटो, मेथी अशा भाजीपाल्यांची मी सेंद्रीय शेतीतून लागवड करू लागले.  

तुम्ही सेंद्रीय शेती कशा प्रकारे करता?

सेंद्रीय शेतीचं माझं मॉडेल ठरलेलं आहे. घरच्या घरी कीटकनाशके तयार करणं, गांडूळ खत तयार करणं, बायोमेट्रिक खते तयार करणं, जिवामृत तयार करणं अशा पद्धतीने आम्ही सेंद्रीय शेती करतो. मी याचं प्रशिक्षण गावातील महिलांनाही देत आहे. त्यांचा याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. गावात सेंद्रीय शेतीचं महत्त्व वाढावे म्हणून मी आणि माझे पती प्रयत्नशील आहोत.

या कार्यात तुम्हाला घरच्यांचा पाठिंबा कशा प्रकारे मिळतो?

घरच्यांचा पाठिंबा आहे त्यामुळेच मी इथवर शेती करू शकले आहे. माझी स्वतःची 14 गुंठे जमीन आहे. त्यावर पाऊण एकर मी इतरांची कसते. मी याआधी शेतमजूर म्हणून मोलमजुरी करायचे. पण आता मी माझं स्वतःचं शेत कसते. हे सर्व मला माझ्या घरच्यांच्या पाठिंब्यामुळे शक्य झालं. ते शेतीच्या प्रत्येक कामापासून ते गावात सेंद्रीय शेतीचं महत्त्व पटवून देण्यापर्यंत सर्वात मला मदत करतात. मी कुणाला सेंद्रीय शेतीचं महत्त्व सांगत असेन तर माझे पती ते समोरच्या व्यक्तीला पटवून देण्यासाठी माझी मदत करतात.  

गावात हे कार्य इतरांना पटवून देताना तुम्हाला काही अडचणी जाणवल्या का?

सुरुवातीला गावातील लोकांना सेंद्रीय शेतीचं महत्त्व कळत नसे. त्यांना समजवून सांगितल्यावर त्याला प्रतिसाद कमी मिळत असे. सेंद्रीय शेतीमुळे उत्पन्नावर परिणाम होतो असा त्यांचा समज असे. आता हळूहळू गावकर्‍यांना सेंद्रीय शेतीचं महत्त्व समजू लागलं आहे. आता गावातील महिला सेंद्रीय शेतीचं महत्त्व समजू लागल्या आहेत व सेंद्रीय शेती करू लागल्या आहेत. मी सुरुवातीला महिलांचे गट करायचे. एक गट तयार केल्यानंतर हळूहळू हे गट वाढू लागले.  

सेंद्रीय शेतीचे महत्त्व तुम्ही काय विशद कराल?

सेंद्रीय शेती ही ‘झिरो बजेट’ शेती आहे. यात खर्च नाही व उत्पन्न उत्तम आहे. तुम्ही घरच्या घरी सेंद्रीय कीटकनाशके, खते तयार करू शकता. तसेच सेंद्रीय शेतीतील उत्पन्नाला बाजारात चांगला भाव मिळतो. कारण त्या भाज्यांची चव चांगली असते. मी सेंद्रीय शेतीतून तूर, टॉमेटो, कांदा, लसूण, मिरच्या इत्यादी उत्पन्न घेते. त्याचा दर्जा उत्तम असतो. सेंद्रीय शेतीचे उत्पन्न आरोग्यालाही उत्तम असल्याने माझी त्यातून उत्तम मिळकत होते. सेंद्रीय शेतीमुळे तुमच्या जमिनीचेही आरोग्य चांगले राहते आणि तुमचेही शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहते.

तुम्ही महिला शेतकर्‍यांना काय संदेश देऊ इच्छिता?

शेतीतील सर्वच कामे महिला करू शकतात. अगदी खुरपणीपासून लावणीपर्यंतची सर्व कामे महिला करतात. महिला जर शेतात काय पेरणी करायची याचे निर्णय घेऊ शकतात तर त्यांनी सेंद्रीय शेती करण्याचा निर्णयही घ्यावा. जास्तीत जास्त सेंद्रीय शेती महिलांनी करावी व आपली मिळकत वाढवावी.  

सेंद्रीय शेतीमुळे तुमच्या उत्पन्नावर काय परिणाम होतो?

सेंद्रीय शेतीमुळे तुमचे उत्पन्न कमी होते असा गैरसमज फार पसरवला जातो. सुरवातीच्या काळात मलाही याचा त्रास झाला. परंतु सेंद्रीय शेतीमुळे खरंतर तुमचे उत्पन्न वाढते. बाजारात सेंद्रीय उत्पादनांना फार चांगली किंमत मिळते आणि याचा खर्चही कमी असतो. त्यामुळे सेंद्रीय शेती ही तुमच्या फायद्याचीच ठरते.

[email protected]