
>> सामन प्रतिनिधी
आपल्या कसदार अभिनयाने कोणतीही भूमिका पडद्यावर जिवंत करणारा सशक्त अभिनेता म्हणजे शशांक शेंडे. मराठीसह बॉलीवूडमध्येही त्यांनी दमदार भूमिका वठवल्या आहेत. आज मराठी इंडस्ट्री आणि बॉलीवूडमध्ये फरक आहे तो केवळ व्यवसायाचा. महाराष्ट्रात मराठी सिनेमांना बॉलीवूडशी तगडी स्पर्धा करावी लागतेय, थिएटरमध्ये प्राईम टाईमसाठी झगडावे लागतेय, हे दुर्दैव असल्याचे शशांक शेंडे यांनी आगामी ‘यंग्राड’ सिनेमानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
‘यंग्राड’चा अर्थ यंग आणि राडा घालणारी असा होतो. नाशिकमध्ये उनाड मुलांसाठी वापरला जातो. अभिनेता शशांक शेंडे यांनी यात मुख्य भूमिका साकारली आहे. सिनेमाविषयी ते म्हणाले, ही पौगंडावस्थेतील मुलांची कथा आहे. आईवडील मुलांवर संस्कार करतच असतात. त्याचप्रमाणे समाजातूनदेखील संस्कार मुलांवर होत असतात. मात्र संस्कारक्षम वयात चुकीचे आयडॉलसमोर असल्याने हे चार युवक अडचणीत सापडतात. त्यातून ते बाहेर पडतात की नाही हे सिनेमात पाहायला मिळेल.
‘रिंगण’नंतर दिग्दर्शक मकरंद माने आणि अभिनेता शशांश शेंडे ‘यंग्राड’ सिनेमासाठी एकत्र आले आहेत. त्याविषयी ते म्हणाले की, मकरंदची गोष्ट मांडण्याची पद्धत मला खूप आवडते. चित्रपट माध्यमाची योग्य जाण असणारे दिग्दर्शक मराठीत मोजकेच आहेत. मकरंद हा त्यापैकीच एक आहे.तो मनोरंजनातून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो.
मराठीसह बॉलीवूडमध्येही शशांक शेंडे यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. हिंदीत स्टाडरडमला सिनेमे चालतात. आपल्याकडे आजही कथानकाला महत्त्व दिले जाते. दोन्ही इंडस्ट्रीत फरक आहे तो व्यवसायाचा. महाराष्ट्रात मराठी सिनेमाला बॉलीवूडशी स्पर्धा करावी लागते, प्राईम टाईमसाठी झगडावे लागते हे दुर्दैव आहे. साऊथमध्ये प्रेक्षकांना हिंदी सिनेमांचा पर्याय दिला जात नाही. तसे आपल्याकडे का होत नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
दिग्दर्शन नको रे बाबा!
शशांक शेंडे दिग्दर्शनाच्या खुर्चीत कधी बसणार याबाबत छेडल्यावर ते म्हणाले, माझ्याकडे स्क्रिप्ट तयार आहे, पण दिग्दर्शन करणे फार अवघड आहे. दिग्दर्शकाला कलाकारांपासून ते तंत्रज्ञांपर्यंत सर्वांची मोट बांधावी लागते.एखादी कलाकृती तयार करायची, त्यासाठी निर्माता शोधायचा, त्यानंतर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपड करावी लागते. सध्या तरी माझा दिग्दर्शनाचा विचार नाही.
व्यावसायिक दृष्टिकोन महत्त्वाचा
मराठीमध्ये चित्रपटावर पोट अवलंबून असणारा एकही निर्माता नाही. जोपर्यंत चित्रपटावर पोट अवलंबून असणारे निर्माते आपल्याकडे उभे राहणार नाहीत तोपर्यंत चित्रपटांकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून आपण पाहणार नाही. हिंदीतले बडे प्रॉडक्शन हाऊस आज मराठी सिनेमांची निर्मिती करतायत. त्यांना मराठी सिनेमात व्यवसाय दिसतोय तसा आपल्या निर्मात्यांना का दिसत नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
‘यंग्राड’ या आगामी मराठी चित्रपटाच्या संगीताचे गायक आणि संगीत दिग्दर्शक शंकर महादेवन यांच्या हस्ते वांद्रे येथे नुकतेच अनावरण करण्यात आले. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने, संगीतकार हृदय गट्टानी, निर्माते विठ्ठल पाटील आणि गौतम गुप्ता हेदेखील उपस्थित होते.




























































