
मी दत्तगुरुंसोबत संवाद साधते. शब्दावाचून कळले सारे म्हणतात ना तसंच त्यांना माझ्या मनातलं सारं न सांगतासुद्धा कळतं. सांगत्येय अभिनेत्री जुई गडकरी…
आज माझे बरेच मित्र-मैत्रिणींचे ग्रुप आहेत. इतका सारा अगणित मित्र-मैत्रिणींचा गोतावळा आजूबाजूला असला तरी मी खरी मोकळी होते ती माझ्या मांजरांसोबत आणि दत्तगुरूंच्या समोरच. मला मनातलं बोलायला मन रीक्त करायला समोर माणूस कधीच नको असतो. मी दत्तगुरुंशी दररोज संवाद साधते. शब्दावाचून कळले सारे म्हणतात ना, तसंच त्यांना माझ्या मनातलं सारं सारं न सांगतासुद्धा कळतं. हा संवाद हा मूक संवाद असतो, पण तरीही तो विलक्षण बोलका असतो आणि स्वानंदाचं दान माझ्या ओंजळीत देणारा!
बहुसंख्य जणांच्या आयुष्यात त्यांना सकारात्मक ऊर्जा देणारा, प्रोत्साहन देणारा, सकारात्मकता देणारा एखादा माणूस असतो. माझ्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर, ती कोणी व्यक्ती नसून माझे दत्तगुरू आणि माझ्या घरातली मांजरं आहेत. म्हणायला गेलं तर ती मांजरं पण माझ्यासाठी माझ्या कुटुंबाचा, किंबहुना माझा एक अविभाज्य भाग आहेत.
मला आठवतं, जेव्हा मी आजारी पडले होते माझं मलाच कळत नव्हतं की काय झालं आणि त्या क्षणी मी दत्तगुरूंचा धावा सुरू केला आणि जादूची कांडी फिरावी तशा त्या वेदना विरून गेल्या. आजच्या घडीला कितीही वाजता शूटिंगचा कॉल टाईम असेल तरी मी ‘दत्त महात्म्य’मधील एक अध्याय वाचल्याशिवाय घराचा उंबरठा ओलांडत नाही. अत्यंत सात्त्विक जीवन कसं जगावं हे मला महाराजांनी शिकवलं. कितीही दुःख असेल, वेदना असेल, काळजी असेल, जबाबदारी, ताणतणाव असेल. पण मी जेव्हा महाराजांच्या पादुकांवरती डोकं टेकवते तेव्हा ते सारं सारं दत्तगुरू स्वतःजवळ घेतात. याची प्रचीती एकदा नव्हे तर अनेकदा मला आली आहे. आज मला डॉक्टरांनी अशा बऱयाच गोष्टी करू नकोस असं सांगितलं आहे. जसे की घोडेस्वारी, ट्रेकिंग, व्यायाम न करणे. माझ्या आजाराच्या दृष्टीने घातलेली ही काही बंधनं आहेत. पण मी हे सारं सारं करते आणि त्याचा मला किंचितही त्रास किंवा वेदना होत नाही आणि याचं सारे श्रेय दत्तगुरूंना जातं.
मला आठवतंय, एका रात्री मी प्रचंड वेदनेने तळमळत होते. डोळ्याला डोळा लागत नव्हता. पुढच्या क्षणी काय होईल हेही कळत नव्हतं. भिंतीला टेकून मी ओक्साबोक्सी रडत होते. एका क्षणी माझ्या डोळ्यातले अश्रू थांबले, जेव्हा मी पाहिलं की माझ्या छातीशी बिलगलेलं मांजरीचं पिल्लू माझे सारे अश्रू त्याच्या इवल्याशा जिभेने चाटून घेत होतं. त्या क्षणी मी अवाक् झाले की एवढंसं तीन-चार महिन्यांचं पिल्लू, नेमकं त्याला काय कळलं असावं? की सारंच कळलं असेल? माझ्या मनातलं, माझं दुःख, वेदना? असाच लळा माझ्या घरातल्या साऱयाच मांजरीने मला लावलाय. निरपेक्ष प्रेम म्हणजे काय हे शिकवलं आहे.
शब्दांकन – निनाद पाटील






























































