काळ्या मातीवरचं अनाम प्रेम

31

>> अश्विनी पारकर

या जगात काहीही फुकट मिळत नाही असं म्हणतात, पण कुणी जीवन कोणतेही मूल्य न आकारता सहज इतरांच्या हाती देताना पाहिलंय? नुकत्याच झालेल्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने या धडपडणाऱया वृक्षपित्याशी ओळख झाली. त्यानंतर समजला 5 लाख झाडांचा पोशिंदा म्हणजेच हिंगोली जिह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील पठाण खय्युम खान. ही वाढवलेली रोपे जगावीत म्हणून लोकांना कोणतेही शुल्क न आकारता त्याचे वाटप करतात. त्यांनी ही रोपे त्यांच्या पाल्याप्रमाणे जगवली आहेत. ते स्वतःच त्यांच्या कार्याची माहिती देत आहेत.

‘माझा दिवस पहाटे 4 वाजता सुरू होतो. झाडांना पाणी दिल्यावर मी माझ्या दिनचर्येला सुरुवात करतो. ही झाडं म्हणजे माझा जीव की प्राण आहेत. पोटच्या पोराप्रमाणे मी ही झाडे वाढवली आहेत. बिब्बा, मोह, कडुलिंब, गावरान आंबे अशी अनेक प्रकारची झाडे माझ्या नर्सरीत आहेत. सामाजिक वनीकरण विभागात काम करणारा मी, माझ्या रोजच्या नोकरीतून वेळ काढत झाडांची निगा राखण्याचे त्यांना जगवण्याचे कार्य करतो. विशेषतः सद्यकाळात गावरान आंब्याच्या रोपांवर माझा भर आहे. आंब्याच्या कोयींचे रोपण करून मी ही झाडे वाढवतो. गावरान आंबे व गावरान झाडे ही टिकली पाहिजेत. कारण त्यालाच खूप महत्त्व आहे असा माझा कयास आहे.

सध्या 11 वाजले तरी उन्हाचा दाह इतका वाढतो की, कामावरून थेट घरी जावेसे वाटते. हे कशामुळे होत आहे असं तुम्हाला वाटतं? हे होत आहे झाडांच्या कत्तलीमुळे. तुम्ही झाडे जगवा, झाड तुम्हाला जगवेल, पण हे सामान्यांना समजवून सांगणार कोण? मुळात माझ्या गावातही झाड संगोपनाचे कार्य हे तुमच्या माझ्यासारख्या माणसांसाठी आहे. ते आपल्याच फायद्याचे आहे हे समजवून देणे फार मोठे कष्टाचे आहे. लोकांना झाड जगवण्याचे महत्त्व कळतही नाही. त्यामुळेच माझ्या नर्सरीच्या कामात मला अनेक अडचणी आल्या. एका शेतकऱयामुळे माझ्या नर्सरीतील काही झाडे जळाली. त्याला मला समजवून द्यावे लागले की, ही झाडे तुझ्याच पिकाचे संरक्षण करणारी आहेत. माळरानावर, शेतीच्या ठिकाणी बाजूला झाडे लावली तर पावसाचे चक्र सुरळीत राहते, पण हे त्यांच्या गळी उतरणार कधी आणि कसे? शहरी भागातही तीच परिस्थिती.

सध्या माझ्या कळमनुरी तालुक्यातील नर्सरीत पाच लाख झाडे आहेत. इतर दोन नर्सऱयांमध्ये मिळून तीन लाखांपेक्षा जास्त झाडे आहेत ही झाडे पाहण्यासाठी दूरदूरवरून लोक भेटीला येतात. डॉक्टर असोसिएशनचे डॉक्टर या नर्सरीला भेट देण्यासाठी आले आणि अचंबित झाले. त्यांनी माझ्या नर्सरीतून कितीतरी झाडे भेट म्हणून नेली. अशा घटना मला आनंद देतात. कारण झाड जगले पाहिजे हेच माझे ध्येय आहे.

मला जिथे मिळतील तिथून मी बिया गोळा करतो. काही वेळा माझ्या स्वतःच्या आर्थिक खर्चातून सोलापूरसारख्या ठिकाणाहून बिया मागवतो. या बिया मी रुजत घालतो. पाऊस नसेल तेव्हा आजूबाजूच्या शेतकऱयांना पाण्यासाठी विनंती करतो. काही निसर्गप्रेमी शेतकरी त्यांच्या शेतातून बोअरवेलचं पाणी सशुल्क माझ्या नर्सरीसाठी देतात आणि माझी झाडे जगतात. वर म्हटल्याप्रमाणे ज्यावेळी माझ्या शेतातील झाडे जळली होती, त्यावेळी मी स्वतः खर्चाने टँकर मागवून त्या झाडांना पाणी घालून ती झाडे जगवली होती. प्रत्येक झाड हे माझ्या मुलाप्रमाणे आहे. त्यानुसार मी प्रत्येक झाडाची काळजी घेतो. उन्हाळ्यात जेव्हा झाडांना पाणी नसते, त्यावेळी मी झाडांभोवती अळ्या करतो. त्यात उन्हाळ्यात सुकलेली झाडाची गळून पडलेली झाडे मी मातीच्या भरावाखाली घालतो आणि त्यांना दर पंधरा दिवसांनी पाणी देतो. त्यामुळेच माझी झाडे जगतात. सामाजिक वनीकरण विभागात काम करताना कधी कधी या कार्याची अभिनंदन स्वरूपात पावती मिळते. ही रोपे मी रस्त्याच्या कडेला रोपण करतो. त्यामुळे काही वरिष्ठ पाठ थोपटतात. बढती मिळावी अशी इच्छा व्यक्त करतात. त्यातच माझे समाधान होते. झाडे जगावीत हेच माझे ध्येय असल्याने झाडांना जगवण्याखेरीज मला कोणताही आनंद समाधान देत नाही.’

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या