खाणं आणि चालणं, प्रदीप पटवर्धन यांच्या सुदृढ शरीरयष्टीचे रहस्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सामना प्रतिनिधी 

ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन. आवडीचं खाणं आणि भरपूर चालणं हे त्यांच्या खाद्यन्तीचे मंत्र.

‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय?

– जे माणसाला आवडतं त्याने ते खावं. कारण जसं वय वाढत जातं तसतशी खाण्यावर बंधनं येतात. त्यामुळे ज्या वयात जे खावंसं वाटतं ते भरपूर खावं. याशिवाय भरपूर चालावं.

खायला काय आवडतं?
– उकडीचे मोदक खूप आवडतात. जवळपास मी शाकाहारीच आहे. मांसाहार करावासा वाटलाच तर चिकन चिल्ली खातो. कारण त्यातून काही काढायचं नसतं. माशांमधले काटे मला काढायला जमत नाहीत. त्यामुळे ते घशात अडकण्याची भीती वाटते. अगदीच कोणी माशांमधले काटे काढून देणारं असेल तर मात्र आयते मासे खातो. स्वतःला मात्र मासे खायला जमत नाही.

खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता?
– फिटनेस काळजी म्हणजे जेवढं जमेल तेवढं चालत राहतो. चालणं हा सगळ्यात चांगला व्यायाम आहे.

डाएट करता का?

– अजिबातच नाही, कारण माझं असं मत आहे की, ज्या वयात जे खायला मिळतं ते माणसाने खाऊन घ्यावं. एकदा वय झालं की, हे-ते खाऊ नका, असं डॉक्टरच सांगतात. त्यामुळे खाण्यावरची आपली इच्छा का मारायची? म्हणून जे खावंसं वाटतं ते खायचं. त्या-त्या वेळी खाल्लेलं अंगी लागतं, पचतं.

आठवडय़ातून किती वेळा बाहेर खाता?
-शक्यतो मी घरीच जेवतो. दुपारी गरम गरम जेवतो. बाहेरगावी दौऱयावर असल्यावर बाहेरच जेवतो. मुंबईत असलो तर रात्री एक-दीड वाजला तरी घरी येऊनच जेवतो.

कोणत्या हॉटेलमध्ये जाता?
-असं काही ठरलेलं नाही. दादरचं तृप्ती, पुण्यातल्या श्रेयस हॉटेलमध्ये जातो. गिरगावातल्या क्षुधा शांतीमध्येही कधी कधी जातो. खास हॉटेलिंग करत नाही.

कोणतं पेय आवडतं?
– ताक आवडत असलं तरीही फार कमी वेळा पितो.

प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणंपिणं कसं सांभाळता?
– तिथे गेल्यावर जे मनाला वाटेल ते खातो. उगाच जास्तही खात नाही आणि रात्री मात्र फारच कमी खातो. तसं एरवीही रात्री मी थोडं कमीच खातो.

दौऱ्यावेळी आवडलेला वैशिष्टय़पूर्ण पदार्थ?
– पुण्यातल्या श्रेयसमधलं जेवण मला खूप आवडतं. नागपूरमध्ये गेलो की, ‘थाटभाट’मध्ये जेवायला आवडतं.

स्ट्रीट फूड आवडतं का?
– कधीतरी कोणीतरी कंपनी सोबत असेल तर खायला आवडतं. रस्त्यावरच्या भय्याकडे उभं राहून पाणीपुरी खायला आवडते.

घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं?
– वहिनी ज्या स्वयंपाक करतील तेच खायला आवडतं.

जेव्हा पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा आवर्जून काय खायला घालता?
– त्यांच्यासाठी जेवण ऑर्डर करतो किंवा त्यांना बाहेर घेऊन खायला घेऊन जातो.

उपवास करता का?
-अजिबात नाही.

स्वतः बनवू शकता अशी डिश आणि त्याची रेसिपी?
– चहा बऱयापैकी बनवतो. त्याव्यतिरिक्त मला काहीही बनवता येत नाही.