स्वस्तात आयफोनची लालच महागात पडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी । मुंबई

नेट सर्फिंग करताना म्युझिक बॉस डॉट इन या संकेतस्थळावर ६० हजारांचा आयफोन १० हजारांत मिळवा अशी जाहिरात वाचून २१ वर्षांचा तरुण खूश झाला. त्या साइटवर दिलेल्या अटी मान्य करत त्याने आयफोनची ऑर्डर देऊन १० हजार पेटीएमद्वारे देऊ केले. त्यानंतर संबंधित साइटवरील फोनवर डिलिव्हरीसाठी संपर्क साधला असता समोरच्यांनी उडावाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली.

मंगेश मंडल (२१) असे ऑनलाइन फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव असून तो वकिलीचा विद्यार्थी आहे. तो नेटवर सर्फिंग करीत असताना त्याला म्युझिक बॉस डॉट इन हे संकेतस्थळ सापडले. त्यावर १० हजारांत आयफोनची ऑफर होती. ६० हजारांचा मोबाईल १० हजारांत मिळत असल्याचे पाहून मंगेशने लगेच फोनची ऑर्डर केली. त्याने पेटीएमद्वारे १० हजार रुपये देऊ केले. एक दिवस त्याने डिलिव्हरीची वाट पाहिली पण फोन न आल्याने त्याने त्या साइटवरील फोन नंबरवर संपर्क करण्यास सुरुवात केली, पण समोरच्यांनी उडावाउडवीची उत्तरे देऊन मंगेशला टाळण्यास सुरुवात केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याने कळताच मंगेशने कफ परेड पोलिसात जाऊन तक्रार दिली. पोलींस अधिक तपास करीत आहेत.