IPL 2019 : वेळापत्रक जाहीर, ‘या’ दोन संघांमध्ये होणार पहिला सामना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या 12 व्या मोसमाचे पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले आहे. आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती देण्यात आली आहे. या वेळापत्रकानुसार पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघामध्ये होणार आहे.

23 मार्चपासून आयपीएलच्या 12 व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवशी ओपनिंग सेरेमनीनंतर चेन्नई आणि बेंगळुरुमध्ये सामना खेळला जाईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन सामने खेळले जाणार आहेत. दुपारी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये लढत होईल, तर सायंकाळी तीन वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्स (दिल्ली डेअरडेव्हील्स)शी होईल. तर 25 मार्चला एकच लढत होणार असून राजस्थान रॉयल्ससमोर पंजाबचे आव्हान असणार आहे.

हिंदुस्थानमध्ये यंदा लोकसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या तारख्या अद्याप जाहीर न झाल्याने आयपीएलतर्फे सध्या फक्त दोन आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्य़ात आले आहे. 23 मार्च ते 5 एप्रिलपर्यंतचे वेळापत्रकार जाहीर करण्यात आले आहे. याआधी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर आयपीएल हिंदुस्थानात होणार की नाही यावर शंका होती. परंतु आयपीएलतर्फे या शंका धुडकावून लावण्यात आल्या आणि यंदाचा मोसम हिंदुस्थानातच होणार हे जाहीर करण्यात आले.