ये तौफा हमने खुद को… वाढदिवशी वॉर्नरची वादळी खेळी, अर्धशतकासह खास विक्रमाची नोंद

मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध ‘करो या मरो’ लढतीत सनरायझर्स हैद्राबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने वादळी खेळी केली. वॉर्नरने फक्त 25 चेंडूत अर्धशतकाला गवसणी घातली. यंदाच्या (आयपीएल 2020) सिझनमधील वॉर्नरचे हे तिसरे अर्धशतक ठोकले. विशेष म्हणजे वॉर्नरचा आज वाढदिवस असून अर्धशतक ठोकल्यानंतर ‘ये तौफा हमने खुद को दिया’, असेच काहीसे त्याने म्हटले असेल.

दिल्ली विरुद्ध लढतीत एकट्या वॉर्नरने पॉवर प्ले (पहिले 6 षटक) मध्ये 54 धावांची लयलूट केली. यंदाच्या सिझनमध्ये पॉवर प्ले मध्ये सर्वाधिक धावा ठोकणारा खेळाडू वॉर्नर ठरला आहे. वॉर्नरने दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ याचा विक्रम मोडला. पृथ्वीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पॉवर प्ले मध्ये 54 धावा केल्या होत्या.

दिल्लीचा फिरकीपटू आर. अश्विन याने वॉर्नरला बाद केले. बाद होण्यापूर्वी त्याने 34चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 66 धावांची खेळी केली. वॉर्नरने ऋद्धिमान साहा याच्या सोबत पहिल्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली.

47 वे अर्धशतक

डेव्हिड वॉर्नर याने 25 चेंडूत अर्धशतक ठोकले. रबाडाच्या गोलंदाजीवर चौकार ठोकून त्याने अर्धशतकाला गवसणी घातली. यंदाच्या सिझनमधील त्याची ही तिसरी तर आयपीएल कारकिर्दीतील 47 वी अर्धशतकीय खेळी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या