
सनरायझर्स हैदराबाद व चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यामध्ये शुक्रवारी आयपीएलमधील लढत दुबई येथे पार पडली. या लढतीत कर्णधार महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपरकिंग्जच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसला. पण तेथील वातावरणामुळे महेंद्रसिंग धोनीला एकेरी-दुहेरी धावा काढल्यानंतर विश्रांती घ्यावी लागत होती. यादरम्यान त्याला दम लागत होता. अखेर गोळ्याही घ्याव्या लागल्या. शेवटी ही लढत चेन्नई सुपरकिंग्ज हरली.
आता क्रिकेटपटूंना येणारा घाम व थकवा आगामी लढतींमध्येही दिसणार आहे. कोरोनाच्या काळात क्रिकेट सुरू झाले आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमी याचा आनंद बेभान होऊन घेत आहेत. पण याचा फटका क्रिकेटपटूंना बसायला नको. त्यांचे आरोग्य चांगले राहायला हवे बस्स. राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये शनिवारी दुपारी अबुधाबी येथील शेख झायेद स्टेडियम येथे सामना रंगला. या लढतीदरम्यान खेळाडूंना रणरणत्या उन्हाचा त्रास होत असल्याचे प्रकर्षाने जाणवले.
मैदानात क्षेत्ररक्षण करीत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूतील खेळाडू मानेमागे थंड पाण्याचा टॉवेल लावताना दिसले. तसेच बेंचवर बसलेले खेळाडूही थंड पाणी किंवा पेय पित असताना दिसत होते. हिंदुस्थानात एप्रिल आणि मे महिन्यात तीव्र उन्हाळा असतो. तसेच ऑक्टोबर महिन्यातही ‘हीट’ जाणवते. यूएईमध्ये ऑक्टोबरमध्ये कमालीची आर्द्रता जाणवू लागली आहे.




























































