IPL 2020 – आता रोहितकडे हिंदुस्थानचे नेतृत्व सोपवायला हवे! माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केले मत

मुंबईकर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने मंगळवारी दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करीत पाचव्यांदा आयपीएल जेतेपदावर मोहोर उमटवली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये संस्मरणीय कामगिरी केलीय. इतर कोणत्याही संघाला अशी कामगिरी करता आलेली नाहीए. याच पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटपटूंकडून रोहित शर्माच्या नेतृत्वगुणांचे काwतुक करण्यात आले आहे. रोहित शर्माच्या खांद्यावर आता हिंदुस्थानच्या टी-20 व वन डे संघाचे नेतृत्व सोपवायला हवे, अशी इच्छाही या क्रिकेटपटूंकडून यावेळी व्यक्त करण्यात आली.

दोघांच्या कामगिरीमध्ये तफावत

विराट कोहली वाईट कर्णधार आहे असे मी म्हणत नाही, पण तुम्ही दोघांच्या कामगिरीवर नजर टाकल्यास रोहित शर्मा नेतृत्वात कसा चांगला आहे हे प्रकर्षाने दिसून येईल. रोहित शर्मा व विराट कोहली या दोघांकडे जवळपास एकाच कालावधीत आयपीएल संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. रोहित शर्माच्या कर्णधारपदात मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017, 2019 व 2020 या सालांमध्ये चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला. पण विराट कोहलीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला एकदाही विजेतेपद जिंकून देता आले नाही. त्यामुळे रोहितकडे हिंदुस्थानी संघाचे नेतृत्व सोपवायला हवे, असे स्पष्ट मत गौतम गंभीर याने यावेळी व्यक्त केले. दरम्यान, वीरेंद्र सेहवागनेही रोहित शर्माच्या कर्णधारपदाचे आणि मुंबई इंडियन्सच्या कामगिरीचे काैतुक केले.

…तर संघ खूप काही गमावणार

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने दोन वर्ल्ड कप आणि तीन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम करण्यात आला. यामुळे तो हिंदुस्थानातील सर्वोत्तम कर्णधार म्हणून ओळखला जातो. रोहित शर्मा कर्णधार असताना मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकलीय. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वोत्तम कामगिरी ठरलीय. रोहित शर्माकडे हिंदुस्थानच्या वन डे आणि टी-20 संघाचे नेतृत्व सोपवायला हवे.

टी-20 सामना कसा जिंकायचा हे त्याला चांगलेच माहीत – वॉन

इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकेल वॉन यानेही सोशल मीडियावर रोहित शर्माच्या नेतृत्वगुणांची स्तुती केली. यावेळी तो म्हणाला, रोहित शर्माकडे आता निश्चितपणे हिंदुस्थानच्या टी-20 संघाचे नेतृत्व सोपवायला हवे. टी-20 लढत कशा प्रकारे जिंकता येईल हे त्याला चांगलेच माहीत आहे. यामुळे विराट कोहलीलाही एक खेळाडू म्हणून आपल्या कामगिरीत सुधारणा आणता येईल.

हातामध्ये छडी घेऊन खेळाडूंच्या मागे लागत नाही – रोहित

मुंबई इंडियन्सच्या देदीप्यमान यशाचे रहस्य कर्णधार रोहित शर्मा याने उघडले. जेतेपद पटकावल्यानंतर त्याने आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, हातामध्ये छडी घेऊन खेळाडूंच्या मागे लागणारा मी कर्णधार नाही. कर्णधार म्हणून मी त्यांना आत्मविश्वास देऊ शकतो. संघामध्ये समतोल राखणे गरजेचे असते. पहिल्या चेंडूपासून आम्ही आमचे काम चोख बजावले. या यशामध्ये सपोर्ट स्टाफचाही सिंहाचा वाटा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या