
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पहिल्याच सामन्यामध्ये रविवारी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने मुंबई इंडियन्सवर चार विकेट आणि दहा चेंडू राखून विजय मिळवला. ललित यादवने 38 चेंडूंमध्ये केलेल्या 48 धावा आणि अक्षर पटेलने 17 चेंडूंमध्ये केलेल्या 38 धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने हा विजय मिळवला. घरच्या मैदानावर खेळताना कर्णधार रोहित शर्माला पराभवाचे तोंड पाहावे लागले. मुंबईच्या ब्रेबॉर्नवर झालेल्या लढतीमध्ये मुंबईने दिलेले 178 धावांचे आव्हान दिल्लीने 18.2 षटकांमध्ये पूर्ण केले, मात्र पराभवाबरोबरच कर्णधार रोहितला 12 लाखांचा फटकाही या सामन्यामुळे बसलाय. धीम्या षटकगतीमुळे कर्णधार रोहितला हा दंड ठोठावण्यात आला. यापुढे अशी चूक झाल्यास दंडाची रक्कम आणखी वाढणार आहे.
मुंबईतील या सामन्यामध्ये षटकांची गती कायम न राखल्याबद्दल म्हणजेच स्लो ओव्हर रेटसाठी रोहित शर्माला दोषी ठरवत त्याला 12 लाखांचा दंड करण्यात आलाय. अशा पद्धतीची चूक रोहितकडून पहिल्यांदाच घडलीय. मात्र पहिल्याच सामन्यामध्ये असा दंड झाल्यामुळे या पुढील मालिकेमध्ये मुंबई इंडियन्सला अधिक सावध राहावे लागणार आहे. कारण पुन्हा एकदा अशी चूक केली तर दर चुकीसाठी दंडाची रक्कम वाढत जाणार आहे.
किमान षटक मर्यादेच्या आयपीएलच्या नियमांनुसार ही संघाची पहिलीच चूक होती म्हणून मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहितला 12 लाख रुपयांचा दंड करण्यात येतोय,’’ असे आयपीएलने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. आयपीएलसाठी बीसीसीआयने तयार केलेल्या नियमांनुसार 20 षटकांचा सामना संपवण्यासाठी एका तासामध्ये किमान 14.1 षटकांची गोलंदाजी गरजेचे आहे.


























































