
इंडियन प्रीमिअर लीगच्या पंधराव्या मोसमामध्ये एकाचढ एक लढती होत आहेत. यात सनरायझर्स हैदराबाद संघाचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याच्या नावाची सर्वत्र चर्चा आहे.

उमरान मलिक याची वेगवान गोलंदाजी पाहून भल्याभल्यांनी तोंडात बोटं घातली आहेत. 150 किलोमीटर प्रतितासाहून अधिक वेगानो गोलंदाजी करणारा उमरान आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

बुधवारी झालेल्या लढतीत त्याने आपल्या वेगाची ताकद दाखवली आणि गुजरातचे पाच गडी टिपले. यातील चार फलंदाजांना त्याने बोल्ड केले.

आयपीएलमध्ये एका डावात चार फलंदाजांना बोल्ड करणारा उमरान फक्त तिसरा खेळाडू आहे. याआधी लसिथ मलिंगाने 2011 आणि एस. त्रिवेदी याने 2012 ला असा कारनामा केला होता.

आयपीएल 2022 उमरान मलिक याने 8 लढतीत 15 बळी घेतले आहेत. वेग आणि कामगिरी या जोरावर त्याने टीम इंडियाच्या दारावर टकटक केली आहे.

उमरानला अद्याप टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी इंडिया-ए संघासाठी त्याची निवड झाली होती, पण दौऱ्यात त्याची निवड झाली नाही.

उमरान मलिक हा मूळचा कश्मीरचा असून त्याचे वडील अब्दुल रशीद फळांचा व्यवसाय करतात.



























































