IPL 2024 – गुजरातचे आज दिल्लीपुढे आव्हान

गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा विजयरथ रोखल्यामुळे गुजरात टायटन्सचे मनोधैर्य कमालीचे उंचावले आहे. दुसरीकडे लखनऊ सुपर जायंट्सचा धुव्वा उडवून दिल्ली कॅपिटल्सचा संघही विजयाच्या मार्गावर परतला आहे. त्यामुळे मनोधैर्य उंचावलेल्या या दोन्ही संघांत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर एक दमदार आणि जोरदार झुंज पाहायला मिळणार आहे. गुजरातला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा होणार असल्याने दिल्लीपुढे यजमानांचेच पारडे किंचित जड मानले जात आहे.

खोलवर फलंदाजी उभय संघांची बलस्थाने

गुजरात टायटन्सकडे कर्णधार शुबमन गिलसह साई सुदर्शन, मॅथ्यू वेड, विजय शंकर, राहुल तेवतिया, शाहरुख खान, राशीद खान अशी खोलवर फलंदाजी आहे. तेवतियाला अद्याप सूर सापडलेला नसल्याने गुजरातच्या गोटात थोडे चिंतेचे वातावरण आहे. राशीदने मोक्याच्या वेळी 11 चेंडूंत नाबाद 24 धावांची खेळी करीत गुजरातच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. गुजरातप्रमाणेच दिल्ली पॅपिटल्सकडेही पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, जॅक फ्रेझर मॅकगर्क, कर्णधार ऋषभ पंत, शाई होप, अक्षर पटेल व कुलदीप यादव अशी खोलवर फलंदाजी आहे, मात्र पृथ्वी शॉ चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे, तर वॉर्नरलाही अद्याप लौकिकास साजेशी फलंदाजी करता आलेली नाहीये. ही सलामीची जोडी चालली तर मग गुजरातच्या गोलंदाजांचे काही खरे नाही.

कुलदीप, अक्षरवर दिल्लीची भिस्त

दिल्लीकडे खलील अहमद, इशांत शर्मा, मुकेश कुमार या वेगवान त्रिकुटासह अक्षर पटेल व कुलदीप यादव अशी सर्वोत्तम फिरकीची जोडगोळी आहे. कुलदीप व अक्षर हे फलंदाजीतही मॅचविनर खेळाडू आहेत. त्यामुळे या दोन अष्टपैलू खेळाडूंच्या कामगिरीवर दिल्लीची खरी भिस्त असेल. दुसरीकडे गुजरातकडे उमेश यादवसारखा अनुभवी आंतरराष्ट्रीय वेगवान गोलंदाज आहे.  पेन्सर जॉन्सन व मोहित शर्माही चांगली गोलंदाजी करत आहेत. याचबरोबर राशीद खान व नूर अहमद या फिरकी गोलंदाजांमध्ये कुठलाही फलंदाजीक्रम उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे. त्यामुळे अहमदाबादच्या स्टेडियमवर दिल्ली-गुजरात या संघांमध्ये एक तुल्यबळ लढत बघायला मिळेल, एवढे नक्की.