IPL 2024 – इम्पॅक्ट प्लेअरचे बारा वाजणार; रोहित, बुमराच्या टीकेनंतर बीसीसीआयचा पुनर्विचार

आयपीएलमध्ये गेल्या मोसमात बारावा खेळाडू म्हणून ‘इम्पॅक्ट प्लेअर’ चा नवा प्रयोग सुरू करण्यात आला होता. आधी या प्रयोगाबद्दल सारेच गप्प होते, पण या बाराव्या प्लेअरचा आयपीएलवर जबरदस्त इम्पॅक्ट पडत असून 200 धावांचे टार्गेटदेखील खुजे वाटू लागलेय. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा यांनी या नियमावर जोरदार टीका केली होती. त्यांच्या टीकेनंतर बीसीसीआय’लाही जाग आली असून त्यांनी ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमावर पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या इम्पॅक्ट प्लेअरचे लवकरच बारा वाजणार असल्याचे संकेत मिळू लागले आहे.

या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंवर नकारात्मक ‘इम्पॅक्ट’

‘इम्पॅक्ट प्लेअर’ हा नियम आयपीएलच्या गेल्या हंगामात लागू करण्यात आला होता. या नियमानुसार संघांना सामना सुरू असताना आपल्या संघात एक बदली खेळाडू खेळविण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र  टीम इंडियाचा कर्णधार व मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंवर नकारात्मक इम्पॅक्ट पडेल, अशी भीती व्यक्त केली होती. त्याने एका मुलाखतीत ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमावर बोलताना आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला की, ‘इम्पॅक्ट प्लेअर नियम हा योग्य आहे असे मला वाटत नाही. क्रिकेट हा 11 खेळाडूंचा खेळ आहे, 12 खेळाडूंचा नाही.’ हा नियम कसा चुकीचा आहे हे सांगण्यासाठी रोहित शर्माने शिवम दुबेचे उदाहरण दिले. तो म्हणाला, ‘शिवम दुबेला इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे गोलंदाजी करण्याची गरजच उरलेली नाही. यामुळे अष्टपैलू खेळाडूंच्या विकासावर याचा नकारात्मक परिणाम होणार आहे.’ रोहितप्रमाणेच जसप्रीत बुमरा यानेही ‘इम्पॅक्ट प्लेअर’ हा नियम क्रिकेटच्या विकासासाठी घातक असल्याचे म्हटले होते.

‘बीसीसीआय’ची चर्चेची तयारी – अरुण धुमल

रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराच्या टीकेनंतर ‘बीसीसीआय’ दबावात आली आहे. या दोघांनी  ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमविरुद्ध उघड भूमिका घेतल्याने बीसीसीआयला स्पष्टीकरण द्यावे लागले. आयपीएल गव्हर्निंग काwन्सिलचे चेअरमन अरुण धुमल यांनी ‘द टेलिग्राफ’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ‘आम्ही नक्कीच या नियमाचा पुनर्विचार करू. आम्ही चर्चेसाठी कायम तयार आहोत.’  त्यामुळे भविष्यात या नियमाबाबत ‘बीसीसीआय’ काय भूमिका घेणार याकडे तमाम क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत.