लोमरोरच्या (13 चेंडू 33 धावा) 3 चौकार आणि 3 षटकारांच्या वादळी खेळीने बंगळुरुच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्यापुढे बंगळुरुचा निभाव लागला नाही. लखनऊने 28 धावांनी विजय नोंदवत बंगळुरुचा पराभव केला.
182 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बंगळुरुला 40 या धावसंख्येवर विराट कोहलीच्या (16 चेंडू 22 धावा) स्वरुपात मोठा धक्का बसला. त्यानंतर एकाच षटकात कर्णधार ड्यू प्लेसिस (13 चेंडू 19 धावा) आणि रजत पाटीदार (22 चेंडू 29 धावा) बाद झाले. ग्लेन मॅक्सवेल (0), ग्रीन (9) आणि अनुज रावत (11) यांना मोठी धावसंख्या करता आली नाही. महीपाल लोमरोरने आक्रमक खेळ करत विजयातले अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला मात्र तो सुद्धा यश ठाकूरच्या गोलंदाजीवर बाद झाला. लखनऊ कडून मयंक यादवने वेगावर स्वार होत 3 विकेट घेतल्या. नवीन उल हकला 2 आणि सिद्धार्थ, यश ठाकूर आणि स्टोईनिस यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
त्तपुर्वी बंगळुरुच्या चिन्नास्वानी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात बंगळुरुने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजीला उतरलेल्या डिकॉक आणि कर्णधार के.एल. राहुलने आक्रमक सुरुवात करत लखनऊला चांगली सुरुवात करुन दिली. डिकॉकने 5 खणखणीत षटकार आणि 8 चौकरांच्या मदतीने 56 चेंडूंमध्ये 81 धावांची ताबडतोब खेळी केली. पहिल्या विकेटसाठी डिकॉक आणि के एल राहूलने (14 चेंडू 20 धावा) 53 धावांची भागीदारी केली. के एल नंतर आलेल्या देवदत पडिकलला (6), स्टोईनीस (24) यांना मोठी खेळी साकारता आली नाही. निकोलस पुरनने 21 चेडूंमध्ये 5 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 40 धावा ठोकल्या.