IPL 2024 – हेटमायरने मैदान मारलं, पंजाबचा पराभव करत राजस्थान तीन विकेटने विजयी

राजस्थान विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यामध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत हेटमायरने 2 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज असताना हर्षदीप सिंगच्या पाचव्या चेंडूवर विजयी षटकार खेचला. हेटमायरने अवघ्या 10 चेंडूंमध्ये ताबडतोब खेळी करत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 27 धावा चोपल्या आणि राजस्थानला विजय मिळवून देत 148 धावांचे लक्ष यशस्वीरित्या पूर्ण केले.

148 धावांच्या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या राजस्थानला यशस्वी जयसवाल (28 चेंडू 39 धावा) आणि तनुष कोटियन (31 चेंडू 24 धावा) यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र संजू सॅमसन (18), रियान पराग (23), ध्रुव जुरेल (6), रोव्हमन पॉवेल (11) यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मात्र संकटमोटक ठरलेल्या हेटमायरने ताबडतोब खेळी करत राजस्थानला विजय मिळवून दिला.

नाणेफेक जिंकून राजस्थानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पंजाबच्या फलंदाजाना लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. त्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. राजस्थानच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे पंजाबला 147 धावांपर्यंतच मजल मारता आली. राजस्थानकडून आवेश खान आणि महाराजा यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. कुलदीप सेन, चहल आणि बोल्ट यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.