IPL 2024 : प्ले ऑफ नव्हे 100 मीटर धावण्याची शर्यत

आयपीएलच्या प्ले ऑफचा क्लायमॅक्स जवळ आलाय, पण कोलकातावगळता एकाही संघाचे स्थान निश्चित नाही. प्ले ऑफच्या तीन स्थानांसाठी पाच संघांच्या या शर्यतीला 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा थरार प्राप्त झालाय. बहुधा साखळीच्या शर्यतीनंतर सर्वच संघांचे गुण समान होण्याची शक्यता आहे आणि अव्वल चार संघांचा फैसला नेट रनरेटने लागणार आहे. सेम टू सेम 100 मीटर शर्यतीसारखा. कोणता तरी संघ शतांश सेकंदांनी म्हणजेच नेट रनरेटच्या जाळय़ात अडकून बाद होणार, हे स्पष्ट आहे.

‘प्ले ऑफ’च्या शर्यतीतून आतापर्यंत तीन संघ बाद झाल्यामुळे पाच संघांचे आव्हान अद्याप कायम आहे. मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स व पंजाब किंग्ज या तीन संघांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. याचबरोबर राजस्थान रॉयल्स या संघाचेही प्ले ऑफमधील स्थान जवळपास पक्के समजले जात आहे. याचाच अर्थ प्ले ऑफच्या अखेरच्या दोन स्थानांसाठी पाच संघांमध्ये जीवघेणी शर्यत असेल. ही शर्यत जिंकणाऱया आणि हरणाऱया संघांचा फैसला नेट रनरेटने लागणार आहे. त्यामुळे नेट रनरेटमध्ये कोण पुढे असेल आणि कोण मागे हे सर्व लढती झाल्याशिवाय कळू शकणार नाही.

– राजस्थान रॉयल्स ः संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्सने पहिल्या टप्प्यात जबरदस्त कामगिरी करीत गुणतक्त्यात अव्वल स्थान काबीज केले होते, मात्र पराभवाच्या हॅटट्रिकमुळे या संघाचे अव्वल स्थान कोलकात्याकडे गेले, तर दुसरीकडे राजस्थानचे प्ले ऑफचे तिकीटही लांबणीवर पडले, मात्र तरीही या संघाचे प्ले ऑफमधील स्थान निश्चित मानले जात आहे. कारण राजस्थानने 12 सामन्यांत 16 गुणांची कमाई केली असून त्यांचा नेट रनरेटही चांगला आहे. शिवाय या संघाला अद्यापि दोन सामने खेळायचे आहेत. हे दोन्ही सामने राजस्थानने गमावले, तरीही ते प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतात. त्याशिवाय त्यांना टॉप-2मध्ये पोहोचण्यासाठी एका सामन्यात विजय मिळवावा लागेल.

– चेन्नई सुपर किंग्ज ः गतविजेता चेन्नई सुपर किंग्जचा संघ सध्या गुणतक्त्यामध्ये तिसऱया स्थानावर आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील या संघाने 13 सामन्यांत सात विजयांसह 14 गुणांची कमाई केली आहे. त्यांचा अखेरचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध आहे. ‘प्ले ऑफ’मधील स्थान पक्के करण्यासाठी त्यांना हा सामना जिंकावाच लागेल. हा सामना पावसामुळे रद्द झाला तर समीकरणे बदलू शकतात, मात्र बंगळुरूपेक्षा चेन्नईचा रनरेट चांगला आहे. त्यामुळे चेन्नईला फक्त सामना जिंकावा लागणार आहे. हैदराबाद आणि लखनौ या संघांनी दोन्ही सामने गमावले तर चेन्नईसह बंगळुरूलाही प्ले ऑफचे तिकीट मिळणार आहे.

– सनरायझर्स हैदराबाद ः पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबाद संघ प्ले ऑफच्या शर्यतीत आघाडीवर आहे. हैदराबादचे सध्या 12 सामन्यांत 14 गुण आहेत. शिवाय रनरेटही त्यांचा चांगला आहे. प्ले ऑफच्या स्थानासाठी हैदराबादला दोन सामन्यांपैकी एक विजय अनिवार्य आहे. हैदराबादने दोन्ही सामने जिंकले, तर ते टॉप-2 मध्ये पोहोचतील, मात्र उर्वरित दोन्ही सामने गमावल्यास त्यांना नेट रनरेटच्या गणितावर अवलंबून राहावे लागेल. हैदराबादचे उर्वरित दोन्ही सामने गुजरात टायटन्स व पंजाब किंग्ज या तळाच्या संघांविरुद्ध आहेत.

– बंगळुरू ः पहिल्या टप्प्यात गळफटलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लागोपाठ पाच सामने जिंकून आयपीएलमध्ये जबरदस्त पुनरागमन केले. आता त्यांच्या प्ले ऑफच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. बंगळुरूने 13 पैकी सहा सामने जिंकून 12 गुणांची कमाई केली आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत हा संघ सध्या पाचव्या स्थानावर आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी बंगळुरूला चेन्नईला मोठय़ा फरकाने पराभूत करावे लागेल. याचबरोबर इतर संघांच्या कामगिरीवरही त्यांना अवलंबून राहावे लागेल. प्रथम फलंदाजी केली तर बंगळुरूला 18 धावांनी विजय मिळवावा लागेल. नाहीतर धावांचा पाठलाग करताना 18.1 षटकांत विजयी लक्ष्य गाठावे लागले. शिवाय हैदराबाद आणि लखनौच्या सामन्यावरही बंगळुरूचे प्ले ऑफचे समीकरण अवलंबून असेल.

– दिल्ली पॅपिटल्स ः ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली पॅपिटल्सचा प्ले ऑफचा मार्ग तसा खडतर आहे. या संघाने 13 सामन्यांत 12 गुण मिळविलेले आहेत. त्यांचा रनरेटही अतिशय खराब आहे. त्यामुळे त्यांना लखनौविरुद्धचा अखेरचा सामना मोठय़ा फरकाने जिंकावा लागेल. शिवाय इतर संघांच्या कामगिरीवरही अवलंबून राहावे लागणार आहे.

– लखनौ सुपर जायंट्स ः लोकेश राहुलच्या नेतृत्वातील लखनौ सुपर जायंट्स संघाला प्ले ऑफ गाठण्याची संधी आहे. या संघाने 12 सामन्यांत 12 गुणांची कमाई केलीय, मात्र प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी लखनौला उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. रनरेट खराब असल्यामुळे एक सामना गमावला तरी लखनौचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. लखनौचे उर्वरित दोन सामने दिल्ली आणि मुंबईविरुद्ध होणार आहेत.