टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा चाहता वर्ग देशभरात मोठ्या संख्येने आहे. त्यामुळेच मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावर त्याच्या जागी हार्दिक पंड्याची निवड चाहत्यांना आवडली नाही. पहिल्या सामन्यापासूनच हार्दिकला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. तसंच हार्दिकच्या नेतृत्त्वात अद्याप एकही सामना मुंबई इंडियन्स जिंकू शकलेली नाही. त्यामुळे रोहित शर्मा पुन्हा मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदाची सुत्रे आपल्या हातात घेणार असल्याची चर्चा सध्या क्रिडाक्षेत्रात रंगली आहे. हिंदुस्थानचा माजी खेळाडू मनोज तिवारीने तसे संकेत दिले आहेत.
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबईची लाजिरवाणी सुरुवात झाली आहे. सलग तीन सामन्यांमध्ये मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे हार्दिकला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात मुंबई विजयाचा श्री गणेशा करेल अशी सर्व चाहत्यांना आशा होती. मात्र राजस्थानने मुंबईचा सहा विकेट राखून दारुण पराभव केला. वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांनी रोष व्यक्त करत पुन्हा रोहित शर्माला मुंबईचा कर्णधार करण्याची मागणी केली. अशातच टीम इंडियाचा माजी खेळाडून मनोज तिवारीने कर्णाधार बदलणार असल्याचे संकेत दिले आहेत.
मनोज तिवारीने क्रिकबझशी बोलताना मोठा दावा केला,”मला असे वाटत आहे की हार्दिक पंड्या दडपणाखाली आहे. त्यामुळेच त्याने राजस्थाविरुद्धच्या सामन्यात गोलंदजी केली नाही. याआधी झालेल्या सामन्यांमध्ये सुरुवातीला चेंडू स्विंग होत असताना त्याने गोलंदाजी केली होती. त्यामुळे त्याने काल गोलंदाजी केली पाहिजे होती” असे मत यावेळी मनोजने व्यक्त केले.
“रविवारपर्यंत मुंबई इंडियन्सची फ्रँचायझी मोठा निर्णय जाहीर करेल असे मला वाटत आहे. रोहित शर्माला पुन्हा कर्णधार बनवले जाईल. फ्रँचायझी क्रिकेट किंवा त्यांच्या मालकांना जेवढ मी समजतो, त्यानुसार ते निर्णय घेताना कोणताही मागचापुढचा विचार करत नाहीत. हार्दिकचे नेतृत्व साधारण दिसले असून मुंबईला अद्याप एकही गुण मिळवता आलेला नाही. गोलंदाजांचा त्याला योग्य वापर करता आलेला नाही. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात जसप्रित बुमराहला 13व्या षटकात गोलंदाजी देण्यात आली. त्यामुळे फ्रँचायझी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे, कारण सध्याचे वातावरण मुंबई इंडियन्ससाठी योग्य नाही,” असा दावा यावेळी मनोज तिवारीने केला आहे.