हार्दिक पंडय़ावर दुहेरी संकट; मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वासह हिंदुस्थानी संघातील स्थानाबाबत प्रश्नचिन्ह

मुंबई इंडियन्सचे नेतृत्व स्वीकारल्यापासून हार्दिक पंडय़ावर ओढावलेले संकट दूर होण्याचे नावच घेत नाहीय. त्याच्यावर असलेला प्रेक्षकांचा राग कायम असताना आता संघाच्या निराशाजनक कामगिरीचे खापरही त्याच्या माथी फोडले जात आहे. मुंबई इंडियन्सच्या विजयात त्याचा सुईइतकाही वाटा नाही, मात्र पराभवाला तोच कारणीभूत असल्याच्या टीकेनंतर त्याचे कर्णधारपद फार काळ टिकणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे. त्यातच आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी एक अष्टपैलू म्हणून त्याचे संघातील निश्चित स्थानही डळमळीत झाले आहे. त्यामुळे दोन आठवडय़ांनी होणाऱया हिंदुस्थानी संघाच्या यादीतून त्याचे नाव गायब झाले तरी कुणाला आश्चर्य वाटणार नाही.

गुजरात टायटन्सला सोडून मुंबई इंडियन्सचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर पंडय़ा दोन्ही आघाडय़ांवर अपयशाचा सामना करतोय. त्याच्या पायगुणामुळे मुंबईची स्थिती खालावल्याचेही बोलले जात आहे. अष्टपैलू असलेल्या पंडय़ाला वारंवार संधी मिळूनही आपल्या झंझावाती फलंदाजीची झलक त्याला दाखवता आलेली नाही. त्याने सहा सामन्यांत 131 धावा केल्या असल्या तरी त्याला टी-20 क्रिकेटला अपेक्षित झंझावात दाखवता आलेला नाही. एवढेच नव्हे तर गोलंदाजीतही तो पूर्णपणे अपयशी ठरला आहे. त्याने 44 च्या सरासरीने केवळ 3 विकेट टिपल्या आहेत. त्याची गोलंदाजीचीही अत्यंत सामान्य वाटत आहे. त्याच्या कामगिरीबद्दल सुनील गावसकर यांनी सामान्य अशी टीका केल्यानंतर इरफान पठाणनेही पंडय़ावर हल्ला चढवला आहे.

एकीकडे वैयक्तिक कामगिरीत सपशेल फेल ठरत असलेला हार्दिक आपल्या नेतृत्वातही गेल्या सहा सामन्यांत कोणतीही चमक न दाखवू शकल्यामुळे निराश झाला आहे. सामन्यापूर्वी हार्दिकच्या चेहऱयावर हास्य दिसत असले तरी सामन्याच्या निकालानंतर त्याच्यामुळे साऱयांचे चेहरे निराशा लपवण्यात अपयशी ठरत आहेत. परिणामतः हार्दिकच्या नेतृत्वाला ब्रेक देण्याचा विचार संघ व्यवस्थापनाच्या मनात डोकावू लागला आहे. जर वेळीच संघावर असलेले अपयशी नेतृत्वाचे सावट दूर नाही केले गेले तर संघावर साखळीतच बाद होण्याचे संकट गहिरे होऊ शकते. त्यामुळे संघव्यवस्थापनाने नेतृत्वबदलाचा पर्याय वापरून मुंबईला वाचवावे, असा सल्ला क्रिकेटतज्ञ देऊ लागले आहेत.

हार्दिकचा पत्ता कट होणार?

आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी हार्दिक पंडय़ाचे स्थान डळमळीत झाले आहे. त्यातच शिवम दुबे, रियान परागसारख्या युवा खेळाडूंच्या कामगिरीने निवड समितीचे लक्ष आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले आहे. हार्दिकची फलंदाजी सामान्य असली तरी त्याच्या गोलंदाजीला धार नाही आणि त्याला चार षटके गोलंदाजी फेकणेही जमत नसल्याचे अवघे विश्व पाहत असल्यामुळे त्याचा पत्ता कट होण्याची शक्यता वाढू लागली आहे. मुंबईचे आणि त्याचे वैयक्तिक अपयश त्याच्यासाठी घातक ठरत असल्याचे चित्र तूर्तास उभे राहिले आहे.