IPL 2024 : बदला घेण्यासाठी मुंबईची स्वारी; राजस्थानविरुद्ध आज परतीची लढत

गत सामन्यात ट्रेंट बोल्टच्या वेगवान वादळात मुंबई इंडियन्सची फलंदाजी कोसळल्यामुळे राजस्थान रॉयल्सने आयपीएलमध्ये शाही विजय मिळविला होता. आता सोमवारी परतीच्या लढतीत त्या मानहानीकारक पराभवाचा बदला घेण्यासाठी मुंबईचा संघ राजस्थानच्या स्वारीवर गेलाय. आयपीएलच्या 17 व्या हंगामात पराभवाच्या हॅटट्रिकनंतर सूर गवसलेल्या मुंबईने चारपैकी तीन लढती जिंकून आपला आत्मविश्वास उंचावलाय. या मनोधैर्याच्या जोरावर गुणतालिकेत नंबर वनच्या सिंहासनावर विराजमान असलेल्या राजस्थानला रोखण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज झाला आहे.

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हे मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील प्रमुख अस्त्र होय. सध्या सर्वाधिक बळींसह बुमराच ‘पर्पल पॅप’चा मानकरीही आहे.जिराल्ड कोत्झीनेही 12 विकेट टिपत बुमराला साथ दिलेली आहे, मात्र आकाश मढवाल व कर्णधार हार्दिक पंडय़ा यांच्याकडून त्यांना फारशी साथ मिळताना दिसत नाही. श्रेयस गोपालकडूनही मुंबईला अधिक चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा असेल. अष्टपैलू मोहम्मद नबीचाही आता गोलंदाजीसाठी वापर करण्याची मुंबईला गरज आहे.

राजस्थानचे सर्वच स्तरावर राज्य

राजस्थान रॉयल्सकडे सुरुवातीसाठी ट्रेंट बोल्ट नावाचा हुकमी गोलंदाज आहे. मध्ये फिरकीपटू युझवेंद्र चहलही प्रतिस्पर्धी फलंदाजांना आपल्या जाळय़ात अडकवत आहे. कुलदीप सेनही संघाच्या मदतीला धावून येतोय. अखेरच्या षटकामध्ये आवेश खानने यशस्वीपणे गोलंदाजीची धुरा सांभाळलेली आहे. त्यामुळे मुंबईच्या फलंदाजीचा सोमवारी खरा कस लागणार आहे. या संघाच्या फलंदाजीबाबत बोलायचे झाल्यास रियान पराग सध्या भलताच फॉर्मात खेळतोय. कर्णधार संजू सॅमसननेही वेळोवेळी उपयुक्त खेळी केलेली आहे. जोस बटलरने तर आतापर्यंत दोन शतके ठोकून हातातून निसटलेले सामने राजस्थानला जिंकून दिलेले आहेत. शिमरॉन हेटमायरही चांगली फलंदाजी करत आहे. केवळ यशस्वी जैसवालचा हरवलेला सूर एवढीच काय ती या संघासाठी चिंतेचा विषय असून बाकी सर्व अलबेल आहे. त्यामुळे सर्वच स्तरावर सरस असलेल्या राजस्थानचा विजयरथ रोखण्यासाठी मुंबईलाही त्या दर्जाचा खेळ करावा लागणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)

रोहित, सूर्यावर मदार 

रोहित शर्मा व सूर्यकुमार यादववर या दोघांवरच मुंबईची फलंदाजी अवलंबून असलेली दिसतेय, मात्र ईशान किशनलाही फलंदाजीत सातत्य दाखवावे लागेल. हार्दिक पंडय़ा व तिलक वर्मा यांनाही अद्याप लौकिकास साजेशी फलंदाजी करता आलेली नाही. प्रत्येक वेळी रोहित व सूर्यावर अवलंबून राहणे मुंबईसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे इतर फलंदाजांनीही आता आपली भूमिका चोखपणे बजावण्याची वेळ आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)