
हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी अड्डय़ांवर केलेल्या हल्ल्यानंतर आज गुरुवारी सीमेवर युद्धसदृश स्थिती निर्माण झाल्यामुळे धर्मशाळेत सुरू असलेला पंजाब आणि दिल्ली यांच्यातील सामना 10.1 षटकांनंतरच थांबवत तो रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. तसेच 11 मे रोजी मुंबई आणि पंजाब यांच्यात धर्मशाळेत होणारा सामनाही अहमदाबाद येथे आधीच स्थलांतरित करण्यात आल्यामुळे धर्मशाळेत आता एकही सामना होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानी दहशतवादी अड्डय़ांवर हिंदुस्थानी सैन्याने हल्ले केले होते. तेव्हाच केंद्र सरकारने धर्मशाळेसह अनेक शहरातील विमानतळं अनिश्चित काळासाठी बंद केली होती. त्यामुळे येत्या 11 मे रोजी धर्मशाळेत होणारा सामना स्थलांतरित करण्याच्या हालचालींचा वेग आला होता. अखेर हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविला जाणार असल्याचे बीसीसीआयने जाहीर केले. मात्र याचवेळेला बीसीसीआयने दिल्ली आणि पंजाब यांच्यातील सामना रद्द का केला नाही, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.
11 मे रोजी होणाऱ्या सामन्यासाठी मुंबईचा संघ पोहोचणार कसा, हा प्रश्न पडल्यामुळे बीसीसीआयने आज हा सामना अहमदाबाद येथे खेळविला जाणार असल्याचे जाहीर केले. पण दिल्ली आणि पंजाबचे संघ धर्मशाळेत आजचा सामना खेळण्यासाठी दोन दिवस आधीच दाखल झाले होते. जर 11 तारखेचा सामना रद्द करण्याची बुद्धी बीसीसीआयला सुचली. त्याचक्षणी आजचा सामना रद्द करण्याचे का सुचले नाही, असा सवाल साऱ्यांना पडला आहे. आजचा सामना खेळवून बीसीसीआयने हजारो क्रिकेटप्रेमींसह दोन्ही संघांतील खेळाडूंचाही जीव धोक्यात टाकला होता. सीमेवरील तणावाच्या स्थितीनंतर कालपासून 11 मेचा सामना हलविण्याच्या हालचालींना वेग आला होता. मुंबईचा संघ धर्मशाळा गाठणे कठीण असल्यामुळे अन्य स्थळांचा विचार केला होता. त्यात मुंबईसह दिल्ली आणि अहमदाबाद ही शहरे आघाडीवर होती आणि अखेर हा सामना अहमदाबादमध्ये खेळविण्याचे निश्चित करण्यात आले.
सामना खेळवलाच कसा?
हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तानवर हल्ले चढवल्यामुळे सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक विमानतळं अनिश्चितकालीन बंद करण्यात आली. अनेक शहरांमध्ये ब्लॅकआऊट केले जाणार होते. ही कल्पना असल्यामुळे बीसीसीआयने 11 मे रोजी मुंबई आणि पंजाब यांच्यात होणारा सामना अहमदाबाद येथे स्थलांतरित करण्यात आला. असे असताना पंजाब आणि दिल्ली यांच्यात आज होणारा सामना खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतलाच कसा? असा सवाल संतप्त क्रिकेटप्रेमींनी केला आहे. समुद्रसपाटीपासून 1457 मीटर उंचीवर असलेल्या धर्मशाळा स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यावर पाकिस्तानने हल्ला करण्याचे कृत्य केले असते तर यात खूप मोठय़ा प्रमाणात मनुष्यहानी झाली असती. आजचा सामना खेळवण्याचा बीसीसीआयने घेतलेला निर्णय निव्वळ मूर्खपणा असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे.
एकीकडे हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यात सीमेवर तणावाची स्थिती उत्पन्न झाल्यामुळे पंजाब आणि दिल्ली यांच्यात सुरू असलेला आयपीएलचा सामना 10.1 षटकांनंतर रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. हा सामना अर्धवट स्थितीत रद्द झाल्यामुळे दोन्हीही संघांना एकही गुण देण्यात आला नाही.
आज दुपारीच बीसीसीआयने 11 मे रोजी मुंबई आणि पंजाब यांच्यात खेळला जाणारा सामना अहमदाबाद येथे हलविण्यात आला होता. मात्र त्याचदरम्यान आज पंजाब आणि दिल्ली यांच्यात खेळला जाणारा सामना खेळविण्याचे जीवघेणे धाडस बीसीसीआयकडून घेण्यात आले होते. एकीकडे सीमेवर दोन्ही राष्ट्रांकडून हवाई हल्ले केले जात असताना धर्मशाळेच्या मैदानातही प्रियांश आर्यने षटकारांचे रॉकेट हल्ले चढवत प्रेक्षकांना अनोखा थरार दाखवला. त्याने प्रभसिमरन सिंगच्या साथीने दहा षटकांतच 122 धावांची जबरदस्त सलामी दिली होती. यात 6 षटकार आणि 12 चौकारांची आतषबाजी करण्यात आली. आर्यने 25 चेंडूंत पन्नाशी गाठली. 35 चेंडूंत 70 धावा ठोकल्यानंतर 11 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूंवर प्रियांश बाद झाला आणि तेव्हाच मैदानातील फ्लडलाइट्स बंद करण्यात आले. सीमेवर युद्धाची परिस्थिती पाहता फ्लडलाइट्स बंद करण्यात आली होती, जी पुन्हा सुरू न करता सामना तेथेच रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.