
पहिल्या जेतेपदाचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला यंदा आयपीएलच्या सर्वच आघाडय़ांवर सरस खेळ करावा लागणार आहे. प्ले ऑफचे तिकीट आधीच बुक केलेला हा संघ मंगळवारी होणाऱया अखेरच्या लीग सामन्यात विजय मिळवून टॉप-टूमध्ये राहण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरेल. दुसरीकडे प्ले ऑफच्या शर्यतीतून आधीच बाद झालेला लखनौ सुपर जायंट्सदेखील किमान स्पर्धेचा शेवट गोड करण्याच्या इराद्याने सर्वस्व पणाला लावताना दिसेल.
बंगळुरूचा गतसामन्यात हैदराबादने धुव्वा उडविला होता, तर लखनौने अव्वल स्थानावरील दिल्ली पॅपिटल्सला हरविले होते. त्यामुळे मागील पराभव विसरून बंगळुरूला लखनौविरुद्ध मैदानावर उतरावे लागेल. दुसरीकडे दिल्लीसारख्या बलाढय़ संघावरील विजयामुळे लखनौचे मनोधैर्य नक्कीच उंचावलेले असेल. त्यामुळे बंगळुरूसाठी उद्याची लढाई नक्कीच सोपी नसेल. बंगळुरूकडे विराट कोहलीसह फिल सॉल्ट, मयांक अगरवाल, रजत पाटीदार, कर्णधार जितेश शर्मा, असा तगडा फलंदाजी ताफा आहे. शिवाय, रोमारिओ शेफर्ड, कृणाल पंडय़ा, टीम डेव्हिड या अष्टपैलू खेळाडूंमुळे बंगळुरूचा फलंदाजी क्रम खोलवर आहे. यश दयाल, भुवनेश्वर कुमार व लुंगी एनगिडी या वेगवान त्रिकुटाला उद्या तिखट मारा करावा लागेल. सुयश शर्मा व कृणाल पंडय़ा हे फिरकीची जबाबदारी सांभाळतील.
दुसरीकडे लखनौकडेही मिचेल मार्श, एडेन मार्करम, निकोलस पुरण, कर्णधार ऋषभ पंत असे एकाचढ एक मॅच विनर फलंदाज आहेत, मात्र पंतचा हरवलेला सूर या संघाची मुख्य समस्या होय. आकाश सिंग, आकाश दीप, आवेश खान, शाहबाज अहमद या गोलंदाजांवर बंगळुरूची खोलवर फलंदाजी रोखण्याचे आव्हान असेल. प्रत्येकवेळी फलंदाजांवर अवलंबून राहता येत नाही, म्हणून हा संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद झालेला आहे, मात्र उद्या घरच्या मैदानावरील लढती गमावण्यासारखे काहीच नसल्याने हा संघ दडपणविरहित खेळ करणार असल्याने खरे दडपण हे बंगळुरू संघातील खेळाडूंवरच असणार आहे.


























































