केन विल्यम्सनचे IPL मध्ये पुनरागमन, लखनऊ सुपर जायंट्स सोबत बुद्धिचा डाव टाकणार

स्वभावाने शांत पण फलंदाजीने आक्रमक असणारा न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार केन विल्यम्सन IPL 2026 मध्ये एका नव्या भुमिकेत दिसणार आहे. आपल्या फलंदाजीने त्याने अनेक मातब्बर गोलंदाजांना पाणी पाजलं आहे. आयपीएलमध्येही त्याने आपल्या फलंदाजीची झलक यापूर्वी दाखवली आहे. मात्र, आता केन विल्यम्सन IPL 2026 मध्ये मैदानाच्या बाहेर लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी महत्त्वाची भुमिका पार पाडणार आहे. LSG चे त्याची संघाचा धोरणात्मक सल्लागार म्हणून निवड केली आहे.

लखनऊ सुपर जायंट्स संघमालक संजीव गोयंका यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत केन विल्यम्सनची धोरणात्मक सल्लागारपदी निवड केल्याची माहिती दिली. “केन विल्यम्सल हा सुपर जायंट्स कुटंबाचा एक भाग आहे आणि लखनऊ सुपर जायंट्ससाठी धोरणात्मक सल्लागार म्हणून या नव्या भुमिकेत त्याचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. त्याचे नेतृत्व, धोरणात्मक अंतर्दृष्टी, खेळाची सखोल समज आणि खेळाडूंना प्रेरणा देण्याची क्षमता संघामध्ये एक अमुल्य भर घालणार ठरेल.” असं संजीव गोयंका यांनी ट्वीटर (X) पोस्टमध्ये म्हटलं आहे.

लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी IPL 2025 चा हंगाम निराशाजनक ठरला. कर्णधार ऋषभ पंतच्या नेतृत्वात संघाला चमकदार कामगिरी करता आली नाही. 14 सामन्यांपैकी 8 सामन्यांमध्ये संघाचा पराभव झाला तर फक्त 6 सामने जिंकण्यात त्यांना यश आलं. त्यामुळे आगामी हंगामात दमदार पुनरागमन करण्यासाठी LSG फ्रेंचायजीने आतापासून कंबर कसली आहे. यासाठीच धोरणात्मक सल्लागार म्हणून केन विल्यम्सनची निवड करण्यात आली आहे.

केन विल्यम्सनच्या शांत स्वभावामुळे आणि संयमी फलंदाजीमुळे हिंदुस्थानात त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. केन विल्यम्सन IPL 2024 मध्ये आपला शेवटचा सामना गुजरात टायटन्स संघासाठी खेळला होता. IPL 2025 मध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, आता IPL 2026 मध्ये केन विल्यम्सन LSG साठी खेळाडूंची निवड, खेळाची रणनीती, खेळाडूंच्या कामगिरीचे विश्लेषण, खेळाडूंना प्रेरणा देणे अशा नवी जबाबदारी पार पाडताना तो दिसणार आहे. केन विल्यम्सने आयपीएलमध्ये 79 सामने खेळले असून 35.46 च्या सरासीने 2128 धावा केल्या आहेत.