IPL 2026 – विदर्भ एक्स्प्रेस ‘प्रफुल’ची ऐतिहासिक एन्ट्री! पहिल्याच ओव्हरमध्ये प्रस्थापित केला जागतिक विक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएलच्या मैदानात दरवर्षी नवे तारे चमकतात, पण विदर्भाच्या प्रफुल हिंगेने आपल्या पहिल्याच सामन्यात जे, करून दाखवले, ते आजवर कोणत्याही गोलंदाजाला जमले नव्हते. सनरायझर्स हैदराबादकडून पदार्पण करणाऱ्या या 24 वर्षीय वेगवान गोलंदाजाने राजस्थान रॉयल्सची फलंदाजी अक्षरशः मोडून काढली. 217 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला प्रफुलच्या पहिल्याच षटकाने असे धक्के दिले की, त्यातून सावरणे त्यांना अशक्य झाले. आयपीएल इतिहासात डावाच्या पहिल्याच षटकात तीन विकेट्स घेणारा प्रफुल हा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर प्रफुलने टाकलेली पहिली ओव्हर एखाद्या स्वप्नासारखी होती. त्याने दुसऱ्याच चेंडूवर फॉर्मात असलेल्या वैभव सूर्यवंशीचा अडथळा दूर केला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर ध्रुव जुरेलला बाद करून त्याने राजस्थानच्या गोटात घबराट निर्माण केली. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर लुआन-ड्रे प्रिटोरियसला बाद करत प्रफुलने आपला ‘हिस्टोरिक स्पेल’ पूर्ण केला. पुढच्याच ओव्हरमध्ये राजस्थानचा कर्णधार रियान परागला बाद करून त्याने प्रतिस्पर्धी संघाचे कंबरडेच मोडले.

विदर्भाच्या घरगुती क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या प्रफुलला हैदराबादने यंदा 30 लाख रुपयांच्या मूळ किमतीत आपल्या ताफ्यात घेतले होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 10 सामन्यांत 27 विकेट्स घेणाऱ्या या गोलंदाजाकडे अनुभव कमी असला तरी जिद्द मोठी होती. केवळ एक टी-20 सामना खेळलेला असतानाही, जगातील सर्वात मोठ्या व्यासपीठावर प्रफुलने दाखवलेली ही चमक भविष्यातील एका मोठ्या स्टारचे संकेत देत आहे. विदर्भाच्या या ‘एक्स्प्रेस’ने आता संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले आहे.