
आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील उर्वरित 31 लढती यूएईमध्ये घेण्यासाठी ‘बीसीसीआय’ने तयारी सुरू केली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेळापत्रक, कोरोनाचे भय, टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन यामुळे उर्वरित ‘आयपीएल’च्या आयोजनासाठी बऱयाच अडचणी येत आहेत. टी-20 वर्ल्ड कप यूएईमध्ये झाल्यास मैदानांची वाट लागायला नको म्हणून उर्वरित आयपीएल स्पर्धेची बाद फेरी आणि अंतिम लढत ही दुबईमध्ये आयोजित करण्यासाठी ‘बीसीसीआय’ विचार करत आहे. कारण आबुधाबी आणि शारजाह येथील मैदाने टी-20 वर्ल्ड कपसाठी राहतील, असे बीसीसीआयचे नियोजन आहे.
25 दिवसांत 31 लढती
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या भरगच्च वेळापत्रकामुळे उर्वरित आयपीएलसाठी समाधानकारक विंडो मिळत नाहीये. त्यामुळे 25 दिवसांत 31 सामने घेण्याची ‘बीसीसीआय’ची योजना आहे. हे गणीत जुळविण्यासाठी 8 ते 10 दिवस दोन-दोन सामने खेळवावे लागणार आहेत. 18 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कप सुरू होणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद ‘बीसीसीआय’कडेच आहे. हिंदुस्थानातील कोरोनाच्या संकटामुळे टी-20 वर्ल्ड कपदेखील यूएईमध्ये स्थलांतरीत करावा लागला. यूएईमध्ये तीनच स्टेडियम असल्यामुळे ‘बीसीसीआय’ आणि यूएई क्रिकेट बोर्डाला 1 ऑक्टोबरपासून यातील दोन स्टेडियम नियमानुसार ‘आयसीसी’च्या ताब्यात द्यावी लागणार आहेत. त्यामुळे आयपीएलची बाद फेरी ही एकटय़ा दुबईमधील मैदानावर होण्याची शक्यता आहे.




























































