अबुधाबीत खेळाडू होणार मालामाल; आयपीएलच्या मिनी लिलावात बोलीयुद्ध पेटणार, पंतचा सर्वोच्च बोलीचा विक्रम मोडणार?

मंगळवारी आयपीएलच्या मिनी लिलावाचा रणसंग्राम पेटणार असून, ऋषभ पंतचा 27 कोटींचा विक्रम मोडणार का, हा एकच प्रश्न क्रिकेटविश्वात खळबळ उडवून देत आहे. आयपीएलच्या 19व्या हंगामासाठी दुपारी 2.30 वाजता अबुधाबी येथे होणाऱया या लिलावात 10 संघांकडे मिळून 237.55 कोटी रुपयांची पर्स असली, तरी संघांमध्ये केवळ 77 जागाच रिक्त आहेत आणि मॅचविनर खेळाडूंना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रचंड चढाओढ पाहायला मिळणार असल्याची शक्यता आहे.

यंदाच्या मिनी लिलावात 350 खेळाडू आपले नशीब आजमावणार असले तरी खरेदी फक्त 77 जणांचीच होणार आहे. 10 संघांनी मिळून आधीच 173 खेळाडू रिटेन केले असून, त्यात 45 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे रिक्त 77 जागांपैकी 25 जागा परदेशी खेळाडूंकरिता राखीव आहेत. प्रत्यक्षात केवळ 52 हिंदुस्थानी खेळाडूंनाच या लिलावात संघांचे दार उघडले जाणार आहेत.

लिलावात उतरलेल्या 350 खेळाडूंमध्ये 40 खेळाडूंची मूळ किंमत दोन कोटी रुपये आहे, तर तब्बल 227 खेळाडू 30 लाख रुपयांच्या मूळ किमतीत उपलब्ध आहेत. मर्यादित जागा, मोठी पर्स आणि प्रतिष्ठsचा सवाल या तिन्ही गोष्टींमुळे काही खेळाडूंवर जोरदार बोली लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांकडे इतरांच्या तुलनेत मोठा निधी शिल्लक असल्याने आजच्या लिलावात त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. कोलकाताकडे 64.30 कोटी रुपये असून 13 जागा रिक्त आहेत, तर चेन्नईकडे 43.40 कोटी रुपये उपलब्ध आहेत. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सकडे केवळ 2.75 कोटी रुपये शिल्लक असल्याने त्यांना काटकसरीचा खेळ करावा लागणार आहे.

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत 16 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीत सहा खेळाडू विकले गेले आहेत. त्यात ऋषभ पंत हा आजवरचा सर्वांत महागडा खेळाडू ठरला असून, मागील मेगा लिलावात लखनौ सुपर जायंट्सने त्याला 27 कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले होते. आजच्या मिनी लिलावात हा विक्रम मोडला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यंदाच्या लिलावात फार मोठे आंतरराष्ट्रीय दिग्गज नसले तरी काही नावांभोवती ‘सरप्राइज पॅकेज’ची हवा आहे. कॅमरून ग्रीन, मथिशा पथिराना, रवि बिश्नोई, जेमी स्मिथ आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांच्यावर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील आकिब नबी, प्रशांत वीर, शिवम शुक्ला, अशोक शर्मा आणि कार्तिक शर्मा हेही आजच्या लिलावात चर्चेचे केंद्र ठरू शकतात.

दर तीन वर्षांनी होणाऱया मेगा लिलावाच्या मधल्या काळात घेतल्या जाणाऱया या मिनी लिलावात संघांची रणनीती, गरज आणि धाडस आज कसोटीला लागणार आहे. मंगळवारचा दिवस केवळ खेळाडूंच्या भवितव्याचाच नाही तर संघांच्या हंगामाच्या गणिताचाही फैसला करणारा ठरणार आहे.