
धोनीच्या विरोधकांना केवळ एकाच प्रश्नाने सतावलेय, तो निवृत्त होतोय का? धोनीने आपल्या निवृत्तीबाबत एक चकार शब्दही काढलेला नाही. मात्र काल चेन्नई चेपॉकवरचा आपला शेवटचा सामना खेळताच ज्या पद्धतीने कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मानवंदना दिली जात होती, त्याने ज्या पद्धतीने चेन्नईच्या प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले, त्यातच महान फलंदाज सुनील गावसकर यांनी धोनीच्या ऑटोग्राफसाठी आपली छाती पुढे केली, हे सारे पाहून उपस्थित धोनीप्रेमी भावुक झालेच, पण ही आपली शेवटची आयपीएल असल्याचे संकेतही खुद्द धोनीनेच दिले आहेत. आता हे संकेत कितपत खरे ठरतात ते लवकरच धोनीच ठरवेल.
आयपीएलचे सोळावे सत्र सुरू होण्यापूर्वीच धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली होती. त्याला अनेकदा याबाबत छेडलेही गेले होते, पण खुद्द धोनीने यावर कधीच आपले मत व्यक्त केले नाही. मात्र काल चेन्नई आपल्या घरच्या चेपॉकवरचा शेवटचा सामना खेळली आणि सामना संपताच धोनीला अवघ्या क्रिकेटप्रेमींनी जी मानवंदना दिली तसेच धोनीच्या ऑटोग्राफसाठी गावसकर पुढे सरसावले. रिंकू आणि वरुणनेही आपल्या जर्सीवर धोनीचे ऑटोग्राफ घेतले. यावरून स्पष्ट संकेत मिळाले की, धोनीची ही शेवटची आयपीएल असावी. चेन्नईचा संघ अद्याप प्लेऑफमध्ये पोहोचला नसला तरी त्याच्या पोहोचण्याची पूर्ण शक्यता आहे आणि प्लेऑफचे दोन सामने चेन्नईच्या चेपॉकवरच खेळविले जाणार आहेत. चेन्नई प्लेऑफला पोहोचल्यास एक सामना चेपॉकवरच खेळणार आहे. जर दुर्दैवाने चेन्नई अव्वल चार संघांत स्थान मिळवू शकला नाही तरच त्यांना चेपॉकवर खेळता येणार नाही.
धोनीने घेतला लॅप ऑफ ऑनर
धोनीने आपली निवृत्ती जाहीर केली नसली तरी त्याने कोलकात्याविरुद्ध हरल्यानंतरही प्रेक्षकांचे आभार मानण्यासाठी घेतलेला लॅप ऑफ ऑनर सारं काही सांगून जात होता. अशी मानवंदना किंवा असे आभार एखादा खेळाडू निवृत्त होत असतानाच घेत असतो. धोनीच्या या लॅप ऑफ ऑनरमध्ये चेन्नईचे सारे खेळाडूही सामील होते. अजूनही प्लेऑफचे सामने बाकी असताना धोनीने आपल्या संघाबरोबर लॅप ऑफ ऑनर का घेतला? असा प्रश्न उभा राहिला आहे. हा त्याचा शेवटचा सिझन आहे की आपल्या चेपॉकवरचा शेवटचा सामना? पुढच्या मोसमात धोनी खेळणार नाही का ? धोनी आता पिवळ्या जर्सीत दिसणार नाही का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना सतावू लागले आहेत.
चेन्नईचे सीईओ म्हणतात धोनी खेळणार
चेपॉकवरच्या लॅप ऑफ ऑनरनंतर धोनी आयपीएलमधून निवृत्त होत असल्याचे सारेच म्हणू लागलेत, पण चेन्नईचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. ते म्हणाले, आम्हाला विश्वास आहे, धोनी पुढचा मोसमही चेन्नईसाठी खेळणार आहे. त्यामुळे आमचे चाहते नेहमीप्रमाणे आम्हाला पाठिंबा देत राहतील.



























































