दिल्ली फायनलपासून एक पाऊल दूर, दुसऱ्या क्वॉलिफायर लढतीत आज चेन्नईचे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
chennai-versus-delhi

सामना ऑनलाईन । विशाखापट्टणम

दिल्ली डेअरडेविल्सने यंदाच्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स नाव धारण केल्यानंतर कामगिरीतही सुधारणा करून दाखवली, मात्र या संघाला आयपीएलच्या इतिहासात एकदाही फायनलमध्ये धडक मारता आलेली नाही. याआधी चार वेळा दिल्लीचा संघ बाद फेरीतच गारद झालेला आहे. आता उद्या महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जला दुसऱया क्वॉलिफायर लढतीत हरवून दिल्लीचा संघ आयपीएलची फायनल गाठून इतिहास घडविणार काय याकडे तमाम क्रिकेटशौकिनांचे लक्ष असेल.

बुधवारी चुरशीच्या एलिमिनेटर लढतीत दिल्लीने सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवला, मात्र आता दुसऱया क्वालिफायर लढतीत उद्या त्यांना आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत यशस्वी ठरलेल्या चेन्नई संघाविरुद्ध लढायचे आहे. पहिल्या क्वॉलिफायनल लढतीत तीन वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सकडून पराभूत झालेला चेन्नईचा संघ दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध जखमी वाघासारखा तुटून पडणार यात वादच नाही. मागील साखळी लढतीत चेन्नईने दिल्लीच्या चेपॉक स्टेडियमवर 80 धावांनी धुव्वा उडवत आयपीएल गुणतालिकेतील त्यांना अव्वल स्थान मिळू दिले नव्हते, मात्र दुसऱया क्वॉलिफायर लढतीच्या निमित्ताने दिल्लीला चेन्नईविरुद्ध मागील मानहानिकारक पराभवाचा बदला घेण्याची संधीही चालून आली आहे.

दिल्लीचा संघ सध्या भलताच फॉर्ममध्ये आहे. त्यांच्याकडे पृथ्वी शॉ, अनुभवी शिखर धवन, कर्णधार श्रेयस अय्यर, रिषभ पंत, कोलिन इंग्राम, शेरफॅन रुदरफोर्ड व ख्रिस मॉरिस अशी खोलवर फलंदाजी आहे. यातील कुठला तरी फलंदाज दिल्लीला चांगली धावसंख्या उभारून देण्यात मदत करत असतो. सलामीवीर शिखर धवन यंदा चांगला खेळतोय. श्रेयस अय्यरनेही स्पर्धेत काही चांगल्या खेळय़ा केल्या. गोलंदाजीमध्ये कॅगिसो रबाडाच्या गैरहजेरीत ट्रेंट बोल्ट, इशांत शर्मा यांनी वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळली आहे. किमो पॉलनेही त्यांना चांगली साथ दिली. याचबरोबर अमित मिश्रा व अक्षर पटेल अशी अनुभवी फिरकीची जोडगोळी दिल्लीच्या दिमतीला असल्याने चेन्नईसाठी उद्याची लढत नक्कीच सोपी नसेल.

चेन्नई संघाबाबत बोलायचे झाल्यास इम्रान ताहीर व हरभजन सिंग यांची फिरकी विशाखापट्टणमच्या खेळपट्टीवर किती चालेल हे बघावे लागेल. दीपक चहर व ड्वेन ब्राव्हो हे वेगवान गोलंदाजीचा मोर्चा सांभाळतील. अष्टपैलू रवींद्र जाडेजाही अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यात माहीर आहे. शिवाय, फाफ डय़ुप्लेसिस, शेन वॉटसन, सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी व अंबाती रायडू यांच्यापैकी एक-दोन जणांची बॅट चालली तरी मग दिल्लीच्या गोलंदाजीचे काही खरे नाही. त्यामुळे शुक्रवारच्या ‘करो या मरो’च्या लढतीत दिल्ली व चेन्नई यांच्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता टिपेला पोहोचली आहे एवढे नक्की.

आजची आयपीएल प्ले ऑफ लढत
चेन्नई सुपरकिंग्ज वि. दिल्ली कॅपिटल्स
विशाखापट्टणम, रात्री 7.30 वा.