
सामना प्रतिनिधी । मुंबई
सलग सहा आयपीएल पराभवानंतर शनिवारी कर्णधार विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाने फॉरमॅट असणार्या किंग्ज इलेव्हन पंजाबवर विजय मिळवत यशाची बोहनी केली. आता विराटच्या संघापुढे स्पर्धेतील आव्हान टिकविण्यासाठी पुढच्या सर्व लढती जिंकाव्याच लागणार आहेत. उद्या सोमवारी मुंबईच्या क्रिकेटवेड्या क्रीडाशौकिनांपुढे बंगळुरूला रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सशी विजयासाठी झुंजावे लागणार आहे. मुंबई इंडियन संघ यंदा वेगळ्याच मूडमध्ये दिसत आहे. पूर्वीचा स्लो स्टार्टर हा कलंक पुसून मुंबईने सुरुवातीच्या चार लढती जिंकल्या आहेत. त्यामुळे गुणतालिकेत केवळ 2 गुणांसह तळाला असणार्या बंगळुरूला विजयासाठी जोरदार संघर्ष करावा लागणार हे निश्चित.
शनिवारच्या पंजाबविरुद्धच्या लढतीत कर्णधार विराट आणि ए. बी. डिव्हिलीयर्स या स्टार फलंदाजांना सूर गवसला हे उत्तमच. कारण या दोन्ही स्टार खेळाडूंमध्ये एकहाती संघाला विजय मिळवून देण्याची क्षमता आहे. कर्णधार कोहलीने सात आयपीएल लढतींतून 270 धावा तर डिव्हिलीयर्सने 7 लढतींतून 232 धावांची बेगमी केली आहे. आपले वडील आयसीयूत असतानाही संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारा यष्टिरक्षक फलंदाज पार्थिव पटेल यानेही 7 लढतींतून 191 धावा जमवल्या आहेत. एकूण स्टार्सचा भरणा असलेल्या उभय संघांतील सोमवारची लढत क्रिकेटशौकिनांसाठी एक धडाकेबाज मेजवानीच ठरेल यात शंका नाही.
रोहित शर्मा परततोय
मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतींतून सावरत सोमवारी पुन्हा मैदानात परतत आहे ही मुंबईसाठी मोठा दिलासा देणारी बाब आहे. आतापर्यंत 165 धावांचा रतीब घालणार्या रोहितला आता पुढच्या लढतीत मोठ्या खेळी कराव्या लागणार आहेत तरच पुन्हा जेतेपदाच्या शर्यतीत आपले स्थान राखणे मुंबईला शक्य होईल. मुंबईचा क्विंटन डिकॉक (238 धावा) फॉर्मात आहे हे मुंबईकरांसाठी सुलक्षणच म्हणावे लागेल. त्यातच धडाकेबाज कायरॉन पोलार्ड (185 धावा), कृणाल पांड्या (92) आणि सूर्यकुमार यादव (154) या स्टार फलंदाजांवर माजी विजेत्या मुंबईची सारी भिस्त असेल. गोलंदाजीची धुरा विंडीजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या आणि मिशेल मॅक्लेनघन यांच्यावर असेल. दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती मात्र मुंबईला चांगलीच जाणवत आहे.






























































