
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यामध्ये उद्या आयपीएलमधील लढत रंगणार असून यावेळी रोहित शर्माची सेना महेंद्रसिंग धोनीच्या ब्रिगेडचा विजयरथ रोखतोय का हे पाहणे यावेळी रंजक ठरणार आहे. चेन्नई सुपरकिंग्जने सलग तीन सामन्यांत ‘जय’ मिळवला असून उद्या त्यांचा संघ विजयाचा ‘चौकार’ मारण्यासाठी सज्ज झाला आहे. मुंबई इंडियन्सला आतापर्यंत दोन लढतींमध्ये पराभव स्वीकारावा लागला असून फक्त एकाच लढतीत विजय मिळवण्यात त्यांना यश मिळाले आहे. त्यामुळे घरच्या वानखेडे स्टेडियमवर लढताना मुंबई इंडियन्सचा कस लागणार हे निश्चित.
फलंदाज अपयशी
मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना पहिल्या तिन्ही लढतींत प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. कर्णधार रोहित शर्मा, युवराज सिंग, क्विण्टॉन डी कॉक, कायरॉन पोलार्ड, हार्दिक पांडय़ा, सूर्यकुमार यादव या सर्वांनाच निराशेचा सामना करावा लागलाय. चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध खेळताना या सर्व खेळाडूंना आपली जबाबदारी ओळखून खेळ करावा लागेल.
जसप्रीतवर पुन्हा मदार
मुंबई इंडियन्सची मदार गोलंदाज जसप्रीत बुमराहवर पुन्हा एकदा असेल. मात्र त्याच्या एकटय़ावर अवलंबून राहणे मुंबई इंडियन्सला महागाड पडू शकते. शेन वॉटसन, सुरेश रैना, अंबाती रायुडू, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान जसप्रीत बुमराह ऍण्ड कंपनीवर असणार आहे.
पाहुणे फॉर्ममध्ये
चेन्नई सुपरकिंग्जने आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स या तीन संघांना पराभूत करीत जेतेपद राखण्याच्या दिशेने दमदार पाऊल टाकले आहे. चेन्नई सुपरकिंग्जच्या ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जाडेजा, इम्रान ताहीर यांनी गोलंदाजीत चमक दाखवली असून उद्याही त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.




























































