आयपीएलचे मीडिया हक्क चार लाख कोटींपर्यंत, आयपीएल अध्यक्ष अरुण धुमल यांचा अंदाज

आयपीएलचे मीडिया आणि ओटीटी हक्क कोटय़वधींना विकले जात आहेत. दरम्यान येत्या 20 वर्षांत आयपीएलच्या मीडिया हक्कांमध्ये 700 टक्यांहून अधिक वाढ होईल, असा विश्वास आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी व्यक्त केला. सध्या हा आकडा 48 हजार कोटी इतका आहे. मात्र 2024 पर्यंत आयपीएलचे मीडिया हक्क सुमारे 50 अब्ज डॉलर्स म्हणजेच चार लाख कोटींपेक्षा अधिकचे असतील, असा अंदाजही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

सुरुवातीपासूनच आयपीएलने हिंदुस्थानबरोबर अवघ्या जगातील क्रिकेटप्रेमींना वेडे करून सोडलेय. दिवसेंदिवस आयपीएलच्या चाहत्यांमध्ये वाढ होत असून अनेक परदेशी पाहुणेदेखील आयपीएलमध्ये गुंतवणुकीसाठी इच्छुक आहेत. यंदाचा आयपीएल मोसम मार्च- एप्रिलदरम्यान सुरू होत असून आत्तापासूनच देशात आयपीएलचे वारे वाहू लागले आहेत.

बंगळुरू येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना अरुण धुमल म्हणाले, आयपीएलची सुरुवात झाल्यापासूनच चाहत्यांमध्ये याची प्रचंड व्रेझ आहे. याच व्रेझमुळे आयपीएलचे सॅटेलाईट, ओटीटी हक्क अब्जावधी रुपयांमध्ये विकले जातात. आगामी काळात आयपीएलचे मीडिया हक्क 50 अब्ज डॉलर्स म्हणजेच चार लाख कोटींहून अधिकवर पोहोचू शकतात. सध्या हा आकडा सुमारे 6.2 अब्ज डॉलर्स म्हणजे 48 हजार कोटी इतका आहे. गेल्या 15 वर्षांचा विचार केला तर 2043 पर्यंत हा आकडा 50 अब्ज डॉलर्स इतका प्रचंड असेल.

क्रिकेट आता ऑलिम्पिकमध्येही दाखल झाल्यामुळे तो लवकरच जगाच्या कानाकोपऱ्यातही खेळला जाईल. महिला प्रीमियर लीग महिला क्रिकेटला एका वेगळय़ा पातळीवर घेऊन जात आहेत. सध्या आयपीएल ही दुसरी सर्वात महागडी लीग आहे. इंग्लंडमधली नॅशनल फुटबॉल लीग पहिल्या क्रमांकावर आहे, असेही धुमल म्हणाले.