मुंबईचे लक्ष्य पाचवा विजय, वानखेडेवर राजस्थान रॉयल्सशी भिडणार

95

सामना प्रतिनिधी । मुंबई

तीन वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्स संघाला उद्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा सामना करावयाचा आहे. याप्रसंगी सहा सामन्यांमधून चार विजय संपादन करणार्‍या मुंबई इंडियन्सला पाचव्या विजयाचे वेध लागले आहेत. राजस्थान रॉयल्सला मात्र आतापर्यंत या स्पर्धेत सूर गवसलेला नाही. त्यांना सहा सामन्यांमधून पाचमध्ये पराभवाचा चेहरा पहावा लागलाय. मुंबई इंडियन्सविरुद्ध तरी त्यांची पराभवाची मालिका थांबतेय का हे पाहणे यावेळी रंजक ठरणार आहे. वानखेडे स्टेडियमवर रंगणार्‍या लढतीकडे तमाम मुंबईकर क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.

आणखी एक पराभव, नको रे बाबा

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आयपीएलच्या यंदाच्या मोसमात सलग सहा सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. उद्या त्यांना किंग्ज इलेव्हन पंजाबला भिडावयाचे आहे. कोहलीची सेना सातत्याने होणार्‍या पराभवाने बिथरलीय. यामधून त्यांना बाहेर यायचे आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ मात्र पाचव्या विजयासाठी जिवाचे रान करताना दिसेल.  

आजच्या लढती

मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स

मुंबई, सायंकाळी 4 वाजता

किंग्ज इलेव्हन पंजाब वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

चंदिगड, रात्री 8 वाजता  

बुमराह ऍण्ड कंपनी  रॉयल्सला रोखणार

मुंबई इंडियन्सकडे एकापेक्षा एक असे सरस गोलंदाज आहेत. जसप्रीत बुमराह, जेसन बेहरनडोर्फ, अल्जारी जोसेफ, कृणाल पांडय़ा यांच्यामध्ये प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखण्याची क्षमता आहे. जोस बटलर, अजिंक्य रहाणे, बेन स्टोक्स, स्टीवन स्मिथ ही राजस्थान रॉयल्सची मंडळी जसप्रीत बुमराह ऍण्ड कंपनीचा कसा सामना करतेय हे पाहायला आवडेल.

पोलार्डचा वन मॅन शो

रोहित शर्माला दुखापत झाल्यामुळे अष्टपैलू खेळाडू कायरॉन पोलार्डच्या खांद्यावर मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या लढतीत त्याने ‘वन मॅन शो’ करीत सामना मुंबई इंडियन्सच्या बाजूने फिरवला. या देदीप्यमान विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या क्रिकेटपटूंचा आत्मविश्वास उंचावला असेलच. रोहित शर्मा उद्याच्या लढतीत खेळण्याची चिन्हे आहेत. यामुळे शनिवारी होणार्‍या लढतीत यजमान संघाचे पारडे जड असेल असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या