
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सवर दणदणीत विजय मिळवला. या विजयात ए बी डिव्हिलीयर्सने अवघ्या 33 चेंडूंत नाबाद 73 धावांची खेळी साकारत सिंहाचा वाटा उचलला. या विजयानंतर बक्षीस वितरण कार्यक्रमात कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेच्या या फलंदाजाच्या कामगिरीचे कौतुक केले. तो म्हणाला, शारजाह येथील खेळपट्टीवर इतर फलंदाज अपयशी ठरीत असताना ए बी डिव्हिलीयर्सने मात्र काबिल ए तारीफ फलंदाजी केली. ही वाखाणण्याजोगी बाब होती.
डिव्हिलीयर्स फलंदाजीला येण्याआधी मी काही चेंडू खेळलो होतो. त्यामुळे मी वेगवान फलंदाजी करण्याच्या तयारीत होतो. पण डिव्हिलीयर्स फलंदाजीला आला आणि त्याने तिसऱयाच चेंडूवर जोरदार फटका मारला. त्यानंतर तो म्हणाला, मला सूर गवसलाय. तिथून त्याच्या फलंदाजीचा झंझावात सुरू झाला. आम्ही दोघांनी चांगली भागीदारी केली. नॉन स्ट्रायकर राहून त्याची फलंदाजी बघता आली, असे कोहलीने आवर्जून नमूद केले.
‘तो’ ठरला दोन संघांमधील फरक
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिक यानेही डिव्हिलीयर्सच्या फलंदाजीची स्तुती केली. यावेळी तो म्हणाला, ए बी डिव्हिलीयर्स हा वर्ल्ड क्लास प्लेयर आहे. फॉर्मात असल्यावर त्याला रोखता येणे मुश्कील आहे. आमच्या गोलंदाजांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, पण यश मिळाले नाही. त्याची फलंदाजी दोन संघांमधील फरक ठरली.
मालवणी तडका (बंगळुरू-कोलकाता लढत)
फिंच, पडीक्कल, विराट आणि डिव्हिलीयर्सच्या लयबद्ध व तालबद्ध बॅटिंगमुळे बंगळुरूची 194 ची मैफल… उत्तरात कोलकाताचो सगळोच शो बेसूर… आज कोलकात्याची बॅटिंग बादल चौधरीच्या शब्दांत – ‘मुलाम्याचा नाणा नि तालाशिवाय गाणा…’































































